गुवाहाटी येथील होम स्टे मध्ये निमिषा ठाकूरिया या २२ वर्षीय तरूणीचा मृतदेह सापडला होता. या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी तिचा बॉयफ्रेंड आसिफ अलीला अटक केली आहे. गँग रेप, हत्या, चुकीच्या पद्धतीने इजा करणे यांसारखी कलमं त्याच्या विरोधात लावण्यात आली आहेत. तसंच ज्या होम स्टेमध्ये निमिषाचा मृतदेह आढळून आला होता ते होम स्टे पोलिसांनी सील केलं आहे. या होम स्टेच्या तीन कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येते आहे.

निमिषाचे वडील दीप ठाकूरिया काय म्हणाले?

निमिषाचा मृतदेह ज्या दिवशी सापडला त्याच्या आदल्या रात्री तिने तिच्या आईला फोन केला होता. मला हे लोक मारहाण करत आहेत. माझ्या छातीवर त्यांनी मारलं, मला जखमी केलं आहे असं तिने तिच्या आईला सांगितलं होतं असं दीप ठाकूरिया यांनी सांगितलं. निमिषाचा मृतदेह नंतर होम स्टे मध्ये सापडला आमच्या मुलीने संध्याकाळी ५ वाजता घर सोडलं होतं. मी माझ्या मित्रांसह जेवायला जात आहे असं तिने सांगितलं होतं. साधारण रात्री १० वाजता तिने आईला फोन केला होता आणि सांगितलं होतं की तिने हे सांगितलं होतं की युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये ती राहणार आहे. त्यानंतर पहाटे २ वाजता तिने आईला फोन केला आणि सांगितलं माझा श्वास कोंडतो आहे. मला हे लोक मारहाण करत आहेत, मला वाचव. अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे. आता या मृत्यू प्रकरणात निमिषाचा बॉयफ्रेंड आसिफ अलीला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारापूर येथील रहिवासी आणि गुवाहाटी विद्यापीठात समाजशास्त्राची विद्यार्थिनी असलेली निमिषा ठाकूरिया ही आसिफ अली नावाच्या तरुणासह गराल भागातील एका होमस्टेमध्ये मुक्कामाला होती. शनिवारी पहाटे ती बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर तिला तातडीने स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून तिला गुवाहाटी मेडिकल कॉलेज व रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वी तपासलं आणि मृत घोषित केलं.

निमिषाने आत्महत्या केल्याचं आसिफ म्हणाला होता-पोलीस

निमिषा आणि आसिफ हे दोघंही रूद्रा किचन होम स्टे मध्ये राहिले होते. आसिफने पोलिसांना हे सांगितलं होतं की निमिषाने आत्महत्या केली. मात्र पोलीस उपायुक्त बलिन देऊरी यांनी हे सांगितलं की आम्ही आता आसिफचं अकाऊंट तपासतो आहोत. तसंच तो खरं बोलतोय की खोटं हे तपासादरम्यान समोर येईलच आम्ही त्याला आता अटक केली आहे. निमिषाचा मृतदेह हा पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. तसंच फॉरेन्सिक टीमने होमस्टे मधल्या रूममधून पुरावे गोळा केले आहेत असंही त्यांनी सांगितलं.

पाचवेळा होम स्टेवर राहिले होते निमिषा आणि आसिफ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आसिफ आणि निमिषा हे या महिन्यात एकूण पाचवेळा या होम स्टेवर राहिले होते. तसंच त्यांनी होम स्टे बुक करताना त्यांची ओळखपत्रं दिली नव्हती. या प्रकरणात होम स्टेचा मालक आणि तीन कर्मचारी यांचीही चौकशी करण्यात येते आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आसिफचा मित्रही त्या होम स्टेमध्ये होता अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही हा पैलूही तपासतो आहोत.