गुजरातच्या राजकोटमधील सुरेंद्रनगर भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या आरोपावरून तिच्या प्रियकराला तिच्याशी सार्वजनिक ठिकाणी तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगून या दोघांना शिक्षा करण्यात आली. एवढंच नाही तर त्या महिलेचे मूत्र प्राशन करण्यास भाग पाडलं गेलं. हा सगळा शुद्धीकरण विधी असल्याचंही सांगण्यात आलं या प्रकरणी आरोपींनी महिलेला आणि तिच्या कथित प्रियकराला मारहाणही केली आणि त्यांचा जाहीर अपमानही करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी एकूण ९ आरोपींना अटक केली आहे.
धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
आरोपींनी या घटनेचं चित्रण केलं आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही केला. ही घटना ४ ऑक्टोबरला घडली आहे. महिलेचा पती आणि तिच्या इतर नातेवाईकांनी हे कृत्य करण्यास लावलं असंही पोलिसांनी सांगितलं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या महिलेला शोधलं आणि त्यानंतर घडला प्रकार समोर आला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. जो व्हिडीओ समोर आला त्यात पीडित महिलेला झाडाला बांधण्यात आलं होतं. तिच्या भोवती लोक जमले होते आणि सगळे तिला हसत होते. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली आणि या प्रकरणाची चौकशी पोलीस अधीक्षक वेदिका बियानी यांच्याकडून करण्यात येते आहे. व्हिडीओ, लोकेशन आणि त्यानंतर त्यात दिसणारे लोक यांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर या सगळ्या घटनाक्रमाचा खुलासा करण्यात आला.
महिला प्रियकरासह पळून गेली होती अशीही माहिती समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला वापीची राहणारी आहे. काही महिन्यांपूर्वी ती तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. मात्र त्यावेळी पती आणि तिच्यात समझोता झाला आणि सदर महिला तिच्या घरी परतली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती तिला बांधून ठेवत होता. त्यानंतर ती पुन्हा एकदा तिच्या प्रियकरासह निघून गेली होती. पोलिसांनी असंही सांगितलं आहे की ही महिला पुन्हा तिच्या प्रियकरासह निघून गेली तेव्हा तिच्या घरातल्यांनी तिचा शोध सुरू केला. ती तिच्या प्रियकरासह सुरेंद्र नगर भागात सापडली. ज्यानंतर या दोघांना एका घरात नेण्यात आलं आणि त्यांच्यावर शुद्धीकरण विधीच्या नावाखाली अत्याचार करण्यात आले. या दोघांना मारहाणही करण्यात आली. एका महिलेवल अत्याचार झाल्याची माहिती आम्हाला एका स्थानिक नेत्याने दिली. आम्हालाही व्हिडीओ मिळाले ज्यानंतर आम्ही सदर महिलेचा शोध घेतला आणि या प्रकरणात एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
या महिलेला झाडाला बांधून मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला तिथून पळून जाण्यातही यशस्वी झाली होती. पण तिला नंतर पुन्हा एकदा पकडण्यात आलं. त्यानंतर तिला झाडाला बांधण्यात आलं या महिलेने प्रेमसंबंध ठेवले म्हणून शुद्धीकरणाच्या नावाखाली तिला आणि तिच्या प्रियकराला मारहाण करण्यात आली आणि या दोघांना सगळ्यांच्या देखत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडलं.
