प्रजासत्ताक दिनी आसाममध्ये सहा तर मणिपूरमध्ये दोन बॉम्बस्फोट, जीवितहानी नाही

कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

मणिपूर येथील बॉम्बस्फोटाचे दृश्य. छायाचित्र एएनआय

६८ व्या प्रजासत्ताक दिनी कडक सुरक्षा तैनात असतानाही आसाम आणि मणिपूरमध्ये गुरूवारी एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाले. आसाममध्ये सहा तर मणिपूरमध्ये दोन स्फोट झाले. परंतु स्फोटाची तीव्रता कमी असल्याने यात कोणी जखमी झाल्याचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. आसामचे पोलीस महासंचालक मुकेश सहाय्य यांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यंत कमी तीव्रतेचे सहा स्फोट झाले असून आतापर्यंत दहशतवाद्यांच्या कोणत्याही गटाने या स्फोटांची जबाबदारी घेतलेली नाही. तर इतर दोन स्फोट हे मणिपूर येथे झाले. इंफाळच्या उत्तरेकडील भागातील मंत्रीपुखरी येथे हा स्फोट झाला. दुसरा स्फोट मणिपूर महाविद्यालयाजवळ झाला.

आसामच्या चराईदेव, शिवसागर, दिब्रूगड आणि तिनसुखिया जिल्ह्यात हे स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दिब्रूगड येथे चौकीढींगी परेड मैदानापासून ध्वजवंदन होत असलेल्या जागेपासून ५०० मीटर अंतरावर स्फोट झाला. कडक सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे दहशतवाद्यांनी बॉम्ब चहा मळ्याजवळ असलेल्या एका नाल्यात स्फोटके फेकली होती. चराईदेव जिल्ह्यात पेट्रोल पंपाजवळ आणि बिहू बोर येथे स्फोट झाला. शिवसागर येथील लेंगीबोर आणि माजपंज येथे स्फोट झाले.
तिनसुखिया जिल्ह्यात आयडीचे स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सिसिमी गावात एका खुल्या टाकीजवळ आणि दुसरा स्फोट सुकना पुखुरी भागातील ढोला पूल येथे झाला. संवदेनशील भागात आणि महत्वाच्या ठिकाणी निमलष्करी दले तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Low intensity blasts in assam manipur on 68th republic day