वाढत्या वयोमानाचा परिणाम पं. रविशंकर यांच्या आरोग्यावर होत होता. त्यामुळे सतारीचे वजन पेलणे त्यांना अवघड जात होते. यावर उपाय म्हणून ते वजनाने हलकी आणि आकाराने लहान सतार वाजवू लागले होते.
पं. रविशंकर यांचे वाद्यनिर्माते संजय शर्मा यांनी उपरोक्त माहिती दिली. पंडितजींना वाढत्या वयानुसार सतार हाताळताना अडचणी येत होत्या. त्या लक्षात घेऊन वेळोवळी आम्ही वाद्याचे वजन आणि आकारमान कमी कमी करत होतो, असे शर्मा यांनी सांगितले. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात शर्मा कुटुंबीयांच्या ‘रिखी राम’ या दुकानाशी पं. रविशंकर यांचा सर्वप्रथम संबंध आला. पंडितजींना त्या वेळी झुबिन मेहता यांच्यासह एका मैफलीमध्ये वादन करायचे होते. त्यामुळे सतारची पुनर्रचना करण्यासाठी ते आमच्याकडे पहिल्यांदाच आले, अशी आठवण शर्मा यांनी सांगितली.
तेव्हापासूनच त्यांच्या गरजेनुसार वाद्यरचना करीत गेलो, असे शर्मा म्हणाले. २००५ मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्या वेळी त्यांच्या पत्नी आणि कन्या यांनी सतारीचे वजन आणि आकारमान अधिक लहान करावे असे सुचविले आणि त्या विनंतीला अनुसरून शर्मा यांनी सतारीचा आकार आणखी लहान केला. तसेच त्या सतारीला एक स्टँडही बसवून दिला. या रचनेमुळे सोफ्यावर बसवूनही सतार वाजविणे रवी शंकर यांना शक्य झाल्याचे, शर्मा यांनी अभिमानाने सांगितले.
विविध प्रकारच्या- आकारांच्या सतार पं. रविशंकर वाजवीत असत. प्रत्येक मैफलीदरम्यान श्रोत्यांना काहीतरी ‘वेगळे’ देण्याची त्यांची इच्छा असे. त्यामुळेच ते अत्यंत प्रयोगशील होते, अशी माहिती संजय शर्मा यांनी दिली.