एअर एशिया इंडिया विमान कंपनीनं विमानानं प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना फक्त ९९ रुपयांत देशातील एक दोन नव्हे तर तब्बल ७ शहरांत विमानानं प्रवास करता येणार आहे. आजपासून ही ऑफर सुरु झाली आहे.
‘कोणीही विमान प्रवास करू शकतो’, अशी टॅगलाइन वापरुन एअर एशियानं सामान्य नागरिकांना विमानानं प्रवास करण्याचं स्वप्न दाखवलं होतं. रविवारी या कंपनीकडून अवघ्या ९९ रुपयांत विमान प्रवास करता येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सामान्य प्रवाशांना पुणे, नवी दिल्ली, बेंगळुरू, कोची, कोलकाता आणि रांची या शहरात अवघ्या ९९ रुपयांत प्रवास करता येणार आहे. २१ जानेवारीपर्यंत तिकीट बुक करता येणार असून १५ जानेवारी ते ३१ जुलैपर्यंत या ऑफर अंतर्गत प्रवास करता येणार आहे. भारतात एअर एशियाची विमान सेवा सुरू होऊन तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या एअर एशियाची १६ शहरांत विमान सेवा सुरू आहे. फक्त देशांतर्गत सेवेसाठीच नाही तर परदेशातही विमान प्रवास करण्यासाठी कंपनीनं ऑफर्स आणल्या आहेत. त्यानुसार साधरण १ हजार ४९९ रुपयांत प्रवासी ऑकलँड, बाली, सिंगापूर आणि सिडनीचा प्रवास करू शकतात असं एअर एशियानं म्हटलं आहे. एअर एशिया इंडियामध्ये टाटा सन्सची ५१ टक्के भागीदारी आहे तर उर्वरित ४९ टक्के शेअर्स हे एअर एशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ऑफ मलेशियाकडे आहेत.