सरसंघचालक मोहन भागवत यांनी ब्रिटनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ब्रिटनमधल्या हिंदूंना संबोधित केलं. ‘सेलिब्रेशन ऑफ वनसेस’ या कार्यक्रमात मोहन भागवत यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं आयोजन हे हिंदू स्वयंसेवक संघ UK आणि इंटीग्रल नावाच्या संस्थेने केलं होतं. या कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले की ब्रिटिश हिंदूंनी त्यांची निष्ठा ब्रिटनसाठी कायमच दाखवली आहे. भारत त्यांची जन्मभूमी असली तरीही कर्मभूमी असलेल्या ब्रिटनला त्यांनी महत्त्व दिलं. त्यांची भूमिका योग्यच आहे असं मोहन भागवत म्हणाले. तसंच जेन झी आणि हिंदू राष्ट्र यांवरही त्यांनी भाष्य केलं.

मोहन भागवत यांनी नेमकी काय भूमिका मांडली?

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, ब्रिटिश हिंदू हे ब्रिटनशी निष्ठा बाळगून आहेत. त्यांची ही भूमिका योग्यच आहे. कारण जी आपली कर्मभूमी असते त्याच्याशी आपली निष्ठा असलीच पाहिजे. जन्मभूमी संस्कार देते आणि कर्मभूमी निष्ठा कशी राखावी ते शिकवते. कर्मभूमीशी गद्दारी कुणीही करता कामा नये. त्यामुळे मला ब्रिटिश हिंदूंची भूमिका पटते. ती अत्यंत सुसंगत अशीच आहे असं मोहन भागवत म्हणाले. पीटीआयने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

जेन झींबाबत काय म्हणाले मोहन भागवत?

जेन झींबाबत भाष्य करत मोहन भागवत म्हणाले की मला नव्या पिढीवर पूर्ण विश्वास आहे. जेन झी असो किंवा जेन अल्फा असो येणाऱ्या पिढ्या या चांगल्या विचारांच्या आहेत. कारण जग चांगलं घडलं पाहिजे हा विचार त्यांच्या ठायी आहे. त्यासाठी ते छोटे-छोटे मतभेद विसरायलाही तयार होतात. तसंच ते त्यांच्या विचारांशी प्रामाणिक आहेत. देश आणि जग घडवण्यात तरुणाईचा मोठा वाटा असणार आहे यात शंका नाही असंही मोहन भागवत यांनी म्हटलंय.

हिंदू राष्ट्र याबाबत काय म्हणाले मोहन भागवत?

हिंदू राष्ट्र या संकल्पनेचा अर्थ इतकाच आहे की देशात विविधता असणं हे स्वाभाविक आहे आणि ऐक्य हेच सत्य आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. जर कुणी हिंदू हा विचार करत असेल की भारतात मुस्लिम माणूस असायलाच नको तर त्याला हिंदू कसं म्हणता येईल? अस्तित्व वेगवेगळं दिसत असलं तरीही प्रत्येकाचा धर्म एकच आहे तो म्हणजे माणुसकीचा. माणसांमध्ये कुठलाही फरक करणं योग्य नाही, कारण प्रत्येकाचे मार्ग वेगळे असले तरीही सगळ्यांचं ध्येय एक आहे असंही मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच मोहन भागवत पुढे म्हणाले की आम्ही जेव्हा हिंदू म्हणतो तेव्हा ती बाब म्हणजे धर्माशी किंवा पूजा पद्धतीशी निगडीत नाही. हिंदू धर्माच्या अंतर्गत अनेक मतमतांतरं असू शकतात. भारतात अनेक विचारधारांचे लोक आहेत. मग ते आस्तिक असोत, श्रद्धाळू असोत किंवा नास्तिक असोत. भारतात विविधता पाहण्यास मिळते तरीही भारतात ऐक्य आहे आहे ते याचमुळे असंही मोहन भागवत यांनी म्हटलंय.