देशभरात एलपीजीचा तुटवडा जाणवतो आहे, स्वयंपकासाठी लोकांना एलपीजी सिलिंडर मिळत नाहीये. आम्ही विरोधक म्हणून या प्रश्नी सातत्याने आवाज उठवत आहोत. तरीही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही पावलं उचलायला तयार नाहीत. त्यांचा हा कारभार कोव्हिड काळातल्या नीतीशून्य कारभारासारखाच आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हटलं आहे राहुल गांधींनी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एलपीजी तुटवड्याबाबत कुठलंही धोरण नाही. लोकांकडे चूल पेटवायलाही पैसे नाहीत अशी स्थिती आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कारभार हा कोव्हिड सारखा नीतीशून्य कारभार आहे. एलपीजीच्या तुटवड्यामुळे गरीब लोकांना, प्रवासी मजुरांना सर्वाधिक फटका बसला आहे. मात्र सरकारला त्यांच्याकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की कोव्हिड काळात जशी स्थिती होती त्याप्रमाणे आम्ही ही परिस्थिती हाताळू. त्यांनी त्यांचं म्हणणं खरं करुन दाखवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कारभार हा कोव्हिड काळाप्रमाणेच नीतीशून्य आहे. अशी पोस्ट लिहून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

प्रवासी मजूर सिलिंडर टंचाईमुळे प्रचंड त्रस्त-राहुल गांधी

राहुल गांधी या पोस्टमध्ये पुढे म्हणाले, ५०० ते ८०० रुपयांच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या प्रवासी मजुरांचं कंबरडं मोडलं आहे. कारण या सगळ्यांसाठी स्वयंपाकाचा सिलिंडर दुरापस्त झाला आहे. घरी परतत असताना या लोकांकडे चूल पेटवायचेही पैसे उरलेले नसतात. त्यामुळे हे मजूर शहर सोडून गावाला जात आहेत. जे मजूर फॅक्टरी आणि टेक्स्टाईल मिल्सचा कणा आहेत ते आज उद्ध्वस्त होत आहेत. टेक्स्टाईल विभाग हा आधीच अतिदक्षता विभागात आहे. उत्पादन घडलं आहे आणि अशात हे नवं संकट आलं आहे. सरकारकडून जी चूक झाली आहे ती सरकारने मान्य केलेली नाही. सरकारच्या आडमुठ्या धोरणांचा फटका या सामान्य लोकांना बसतो आहे अशीही टीका राहुल गांधींनी केली आहे.

वाढलेली महागाई, कमी झालेलं उत्पादन सिलिंडरची टंचाई या सगळ्या गोष्टींमुळे प्रवासी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र या समस्यांकडे पाहण्यासाठी सरकारला वेळ नाही अशी बोचरी टीका राहुल गांधींनी केली आहे. इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई करत हल्ला चढवला. या युद्धाला आता पाच आठवडे झाले आहेत. दरम्यान सिलिंडरची टंचाई आपल्या देशात जाणवते आहे. दरम्यान राहुल गांधींनी मोठी पोस्ट लिहून सरकारचा कारभार धोरणशून्य असल्याची टीका केली आहे. आता यावर भाजपाकडून राहुल गांधींना काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.