LPG Cylinder Booking Aadhaar Biometric Mandatory : घरगुती एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ ऑक्टोबर २०२६पासून अनुदानासह नियंत्रित किरकोळ दरात एलपीजी रिफिल बुक करण्यासाठी ‘बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण’ अनिवार्य असणार आहे, अशी घोषणा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने केली आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, १९ सप्टेंबरपर्यंत २७.४३ कोटी सक्रिय घरगुती एलपीजी ग्राहकांनी म्हणजेच ८९.९ टक्के ग्राहकांनी ‘बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण’ पूर्ण केले आहे. या ग्राहकांना पुन्हा कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नाही. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

आधार प्रमाणीकरण कसे करायचे?

ज्या ग्राहकांनी अद्याप बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही, त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिलिंडरच्या डिलिव्हरीवेळी डिलिव्हरी कर्मचाऱ्यामार्फत तेल कंपनीच्या मोबाईल ॲपद्वारे हे प्रमाणीकरण पूर्ण करू शकतात, अथवा आपल्या संबंधित गॅस वितरकाच्या शोरूममध्ये थेट जाऊन ही प्रक्रिया पार पाडू शकतात. याशिवाय, घरबसल्या स्वतःहून कारवाई करायची झाल्यास, संबंधित तेल विपणन कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारेही हे प्रमाणीकरण सहजपणे करता येऊ शकते.

  • इंडेन ग्राहकांसाठी – IndianOil ONE
  • भारतगॅस ग्राहकांसाठी – HelloBPCL
  • एचपी गॅस ग्राहकांसाठी – HP PAY

अर्थात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पोर्टलवर स्व-ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी व्हिडीओ ट्युटोरियल्सही उपलब्ध आहेत.

प्रमाणीकरण केले नाही तर एलपीजी मिळणार नाही का?

एलपीजी मिळणे बंद होणार नाही. मात्र अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक असेल. ज्या ग्राहकांना बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करायचे नाही किंवा काही कारणामुळे ते पूर्ण करता येत नाही, ते आपल्या ओएमसीच्या डिजिटल माध्यमातून आपली निवड नोंदवू शकतात. यासाठी वेब पोर्टल, मोबाइल ॲप, व्हॉट्सॲप चॅटबॉट किंवा आयव्हीईआरएसचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशा पद्धतीने नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना अनुदानाशिवाय, बाजारभावाने उपलब्धतेनुसार ५ किलो किंवा १० किलो वजनाचे एलपीजी सिलिंडर दिले जातील.

आधार प्रमाणीकरण का अनिवार्य केले?

पेट्रोलियम मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अनुदानाचा लाभ खऱ्या आणि पात्र घरगुती ग्राहकांपर्यंतच पोहोचावा, हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. तसेच, दुबार किंवा अपात्र जोडण्यांची ओळख पटवणे आणि अनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडर्सचा व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी होणारा वळवणीचा प्रकार रोखणे, हा देखील याचा उद्देश आहे.

शासकीय आकडेवारीनुसार, घरगुती एलपीजी सिलिंडर सध्या त्याच्या प्रत्यक्ष बाजारातील किमतीपेक्षा कमी दराने विकला जात आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये १४.२ किलोच्या सिलिंडरवर मिळणारी अप्रत्यक्ष अनुदान सुमारे २१० रुपये होते, तर यापूर्वी जून २०२६ मध्ये हीच रक्कम प्रति सिलिंडर सुमारे ७२१ रुपये इतकी होती. घरगुती एलपीजीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवण्यासाठी सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना आर्थिक भरपाई दिली जाते, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

ग्राहकांनी काय करावे?

ज्या ग्राहकांनी अद्याप बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही, त्यांनी १ ऑक्टोबरपूर्वी प्रमाणीकरण पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनुदानासह नियंत्रित दरात एलपीजी रिफिल बुक करता येईल.

एलपीजी सेवांशी संबंधित मदतीसाठी ग्राहक टोल-फ्री हेल्पलाइन १८०० २३३३ ५५५ वर संपर्क करू शकतात.