LPG Cylinder Shortage India : पश्चिम आशियातील युद्ध आणि इराणने होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर रोखल्याने जागतिक ऊर्जा पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे एलपीजी पुरवठ्याबाबत भीती निर्माण झाली आहे. याबाबत निराकरण करण्यासाठी सरकारने शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी संयुक्त आंतर मंत्रालयीन बैठकीचे आयोजन केले होते. सरकारने एलपीजी वितरकांच्या बाहेर रांगेत उभे राहण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

वितरकांच्या बाहेर उभे रांगा लावू नका

पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा म्हणाल्या, एलपीजी वितरकांच्या बाहेर रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ग्राहकांनी ऑनलाईन सिलिंडर बूक करावे. ऑनलाईन बुकिंग फेब्रुवारीमध्ये ७१ टक्क्यांवरून मार्चमध्ये ८३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

एलपीजी उत्पादन ३० टक्क्यांनी वाढले

तसंच, घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात घट झाल्याची चिंतेचे निराकरण करताना केंद्र सरकारने घरगुती अखंड पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. ५ मार्चच्या तुलनेत घरगुती एलपीजी उत्पादन ३० टक्क्यांनी वाढले आहे.

एलपीजी चिंतेचा विषय पण…

एलपीजी हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. आमची बहुतेक आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. सामुद्रधुनी बंद होणे ही चिंतेची बाब आहे. परंतु, २५ हजार वितरकांपैकी कोणत्याही वितरकाने ड्रायआऊट झाल्याची नोंद केलेली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. घाबरून जाऊ नका, असं आवाहनही पेट्रोलिअम मंत्रालयाने केले आहे.

सुजाता शर्मा म्हणाल्या, “कच्च्या तेलाच्या बाबतीत आपल्याकडे २५८ मेट्रिक टन शुद्धकरण क्षमता आहे. पेट्रोल आणि डिझेल उत्पादनात आपण स्वंयपूर्ण आहोत. परिणामी भारतात हे इंधन आयात करण्याची आवश्यकता नाही. आमचे सर्व शुद्धीकरण कारखाने सध्या १०० टक्के किंवा त्याहून अधिक क्षमतेने कार्यरत आहेत. शुद्धीकरण कारखाने कच्च्या तेलाचा पुरेसा साठा ठेवतात आणि शिवाय पुरवठा सातत्याने राखला जात आहे. घरगुती ग्राहकांना पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा कोणत्याही व्यत्ययाशिवाय किंवा कपातीशिवाय सुनिश्चित केला जात आहे. या परिस्थितीमुळे घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही.”

PNG कनेक्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करा

“शिवाय आपल्या प्रमुख शहरी शहरे आणि केंद्रांमधील व्यावसायिक ग्राहकांबद्दल बरेचजण सध्या एलीपीजी पुरवठ्यावर अवलंबून असल्यामुळे अडचणींना तोंड देत आहेत. भारत सरकार त्यांच्या चिंता दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आम्ही अशा सर्व व्यावसायिक ग्राहकांना पीएनजी कनेक्शन मिळवण्यासाठी त्यांच्या स्थानिक शहर गॅस वितरण नेटवर्क एजन्सीशी किंवा त्यांच्या नियुक्त डिलरशी संपर्क साधण्याचे आवाहन करतो”, असं पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा म्हणाल्या.

कोणीही साठा केलेला नाही, पंपांवर इंधन पुरेशा प्रमाणात उपलब्ध

“सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. एलपीजीबाबत मी हे सांगू इच्छिते की आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. तरीही या परिस्थितीत असूनही आमच्या २५ हजार वितरकांपैकी कोणत्याही वितरकामध्ये ड्रायआऊटची नोंद झालेली नाही. मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की अफवांवर विश्वास ठेवू नका. सुमारे १ लाख किरकोळ दुकानांवर इंधनांचा कोणताही साठा नसल्याचे वृत्त आहे. सर्व पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.