पीटीआय, नवी दिल्ली
पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यातील युद्धाचे चटके भारतातील सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागले आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) घेतला. सिलिंडरचे दर शनिवारी तात्काळ लागू झाले असून वर्षभरातील ही दुसरी वाढ असल्याने विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
‘आयओसी’च्या संकेतस्थळानुसार, विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर म्हणजे सामान्य कुटुंबे स्वयंपाकघरात वापरत असलेल्या सिलिंडरची किंमत दिल्लीत आता प्रति १४.२ किलोसाठी ९१३ रुपये, तर मुंबईत ९१२.५० रुपये असेल. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही दरवाढीचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यांना आता प्रति १४.२ किलो सिलिंडरसाठी ६१३ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर त्यांना वर्षातून १२ रिफिलसाठी मिळणार्या प्रति बाटली ३०० रुपये अनुदान द्यावे लागेल. जागतिक स्तरावर ऊर्जेच्या किमती वाढल्यामुळे ही वाढ आवश्यक असल्याचे उच्च सरकारी सूत्रांनी सांगितले.
१४.२ किलोग्रॅम सिलिंडरचा जागतिक सरासरी दर १,०५० असून त्यापेक्षा भारतातील दर कमी आहे. प्रति कुटुंब दरवर्षी ४-५ सिलेंडरचा सरासरी वापर लक्षात घेता, ही वाढ चार जणांच्या कुटुंबासाठी दररोज ८० पैसे किंवा प्रति व्यक्ती फक्त २० पैसे इतकी आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असली तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अद्याप वाढ होणार नसल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांकडे पुरेशी क्षमता असल्याचे सांगण्यात आले.
विरोधकांचे टीकास्त्र
नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेसने पंतप्रधानांना ‘महागाईचे जनक’ असे संबोधले. ‘‘पंतप्रधान नेहमीच सर्वसामान्यांवर महागाईचा आसूड चालवत असून त्यामुळे सामान्य कुटुंबाचा आर्थिक डोलारा कोसळत आहे,’’ अशी टीका काँग्रेसने ‘एक्स’वर केली. सिलिंडरची किंमत कमी करण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे करावी की अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे करावी याबाबत संपूर्ण देश गोंधळलेला आहे, अशी टीका आम आदमी पक्षाने केली.
तेल खरेदीसंबंधी टीकेला सरकारचे प्रत्युत्तर
नवी दिल्ली : अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची सवलत जाहीर केल्यानंतर विरोधकांकडूून केंद्र सरकारला लक्ष्य केले जात आहे. मात्र त्यांच्या टीकेला केंद्राने शनिवारी प्रत्युत्तर दिले. ‘‘भारत आपल्या राष्ट्रीय हितासाठी जिथून योग्य वाटेल तिथून तेल खरेदी करेल. इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला आहे. अशा स्थितीत जो देश सर्वोत्तम दर देईल, त्या कोणत्याही देशाकडून भारत कच्चे तेल खरेदी करणे सुरूच ठेवेल,’’ असे केंद्र सरकारने प्रत्युत्तरात म्हटले आहे.
नोंदणीसाठी आता २५ दिवसांचा कालावधी
पुणे : आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या दुसर्या सिलिंडरसाठी १५ दिवसांचा कालावधी बदलून २५ दिवसांचा करण्यात आला आहे; तसेच केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर महिनाभरातून एकच देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयांनी नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांना घरात दोन एलपीजी सिलिंडर वापरण्याची परवानगी असते. त्यासाठी पहिल्या सिलिंडर घेतल्यानंतर १५ दिवसांनी अर्ज करता येत होता. आता अचानक कालावधी वाढविण्यात आला आहे. ‘आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला असेल तर, ते जाहीर करावे. अशा कठीण परिस्थितीत नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. सत्यस्थिती समजल्यास नागरिकांनाही पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळेल,’ असे सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले.
आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर महिनाभरातून एकच देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व गॅस वितरक केंद्रांना लेखी आदेश देण्यात आले आहे. पुरवठा सुरळीत होईल, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. ग्राहकांनी गॅस आरक्षणासाठी एकाचवेळी ऑनलाइन प्रक्रिया केल्याने यंत्रणेवर ताण येत असल्याने समस्या निर्माण होत आहे. – महेश सुधाळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी
पहिल्यांदा महिन्यातून दोन गॅस सिलिंडर देता यायचे. आता मात्र युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना महिन्यातून एकच गॅस सिलिंडर देण्याचे लेखी आदेश केंद्र सरकारकडून एजन्सींना देण्यात आले आहेत. त्यानुसार गॅसचे वितरण होणार आहे. – प्रवीण खंडाळकर, उपाध्यक्ष, ऑल इंडिया गॅस वितरक संघटना
‘आतापर्यंत पहिला सिलिंडर घेतल्यानंतर १५ दिवसांनी दुसर्या सिलिंडरसाठी अर्ज करता येत होता. नेहमीप्रमाणे दुसरा सिलिंडर मिळावा म्हणून ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला. मात्र दुसर्या सिलिंडरसाठी २५ दिवसांनी पुन्हा अर्ज करून बघा, असा संदेश मिळाला. अनेक नागरिकांना अशाच प्रकारची अडचण येत आहे. – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच
