वृत्तसंस्था, नवी दिल्ली

स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसच्या (एलपीजी) पुरवठ्यातील अडचणीची परिस्थिती सलग तिसऱ्या आठवड्यातही कायम आहे. घरगुती वापरासाठी गॅसची मागणी हळूहळू कमी होत असली तरी व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी पुरवठ्यावरील निर्बंध कायम आहेत. त्यामुळे विशेषतः हॉटेल उद्योगाच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १३ मार्चला ८७.७ लाख इतकी घरगुती गॅस सिलिंडरची सर्वोच्च मागणी नोंदवण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू ती कमी होत गेली. १९ मार्चला देशभरात ५५ लाख गॅस सिलिंडरची मागणी नोंदवण्यात आली, आदल्या दिवशी ती ५७ लाख इतकी होती असे शर्मा म्हणाल्या. युद्ध सुरू होण्यापूर्वी प्रतिदिन ५० ते ५५ लाख गॅस सिलिंडरची मागणी नोंदवली जात होती.

पश्चिम आशियातील युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक जवळपास बंद झाली आहे. भारताची एलपीजीची ६० टक्के आयात यात मार्गाने होते. इतक्या मोठ्या प्रमाणात एलपीजी कपात झाल्यामुळे केंद्र सरकारने घरगुती, रुग्णालये, शाळा इत्यादींसाठी एलपीजीपुरवठ्याला प्राधान्य देऊन व्यावसायिक वापरावर निर्बंध घातले आहेत. त्याचवेळी घरगुती वापराच्या गॅस रिफिलिंगसाठी मागणी कमी झाल्यामुळे परिस्थिती हळूहळू सामान्य होत असल्याची चिन्हे आहेत.

गेल्या दोन आठवड्यांमध्ये देशांतर्गत एलपीजी उत्पादन ४० टक्क्यांनी वाढले आहे आणि गेल्या आठवड्यात ११ हजार ३०० टन व्यावसायिक एलपीजी व्यावसायिक आस्थापनांना वितरित करण्यात आले होते, अशी माहिती शर्मा यांनी दिली.