नवा महिना सुरू होताच महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे. तेल कंपन्यांनी LPG गॅसच्या किमतीत १०२.५० रुपयांनी वाढ केली आहे. या किमती १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरवर (कमर्शियल एलपीजी सिलिंडर) वाढवण्यात आल्या आहेत. किमतीत वाढ झाल्यानंतर या निळ्या रंगाच्या सिलिंडरची दिल्लीतील नवीन किंमत आता २ हजार ३५५.५० रुपये झाली आहे.

१९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर आता २ हजार ३५५. ५० रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी त्याची किंमत २हजार २५३ रुपये होती. त्याच वेळी, ५ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत सध्या ६५५ रुपये आहे. महिनाभरापूर्वी १ एप्रिल रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यापूर्वी १ मार्च रोजी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत १०५ रुपयांनी, तर २२ मार्चला ९ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

उपाहारगृहे, मिठाईवाले यांचेही बजेट बिघडणार –

मिठाईवाले आणि रेस्टॉरंट इत्यादींद्वारे व्यावसायिक सिलिंडरचा अधिक वापर केला जातो. अशा परिस्थितीत १०२.५० रुपयांच्या या वाढीमुळे त्यांचे मासिक बजेट बिघडणार आहे. दुसरीकडे, येत्या काही महिन्यांत लग्नसमारंभात त्यांचा भरपूर वापर केला जातो, त्यामुळे केटरिंग सर्व्हिसचे लोकही त्यांच्या किमती वाढवू शकतात.