Sandeep Tomar Retired Captain arrested in wife murder case: देशभरात एलपीजी गॅसचा तुटवडा भासत असल्यामुळे जो तो गॅस सिलिंडर मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. गॅस सिलिंडर बुक करण्याच्या नादात पोलिसांना एका जुन्या हत्या प्रकरणातील आरोपी सापडला आहे. आरोपी संदीप तोमर सैन्यदलात माजी कॅप्टन होता. पत्नीचा खून केल्यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्याला दोषी मानले होते. मात्र चार वर्षांपासून तोमरने पोलिसांना गुंगारा दिला होता.
मध्य प्रदेशच्या पांढुर्णा जिल्ह्यातून संदीप तोमरला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात सादर केले असता शनिवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. २०१३ साली अबोहर येथे तैनात असताना तोमरने पत्नी श्वेता सिंहचा खून केल्याचा आरोप आहे.
त्या दोन चुका आणि संदीप तोमर जाळ्यात अडकला
पत्नीच्या हत्येबद्दल दोषी ठरवल्यानंतर संदीप तोमरने पळ काढला होता. त्याने आपली ओळख बदलली, रुप बदलले. तसेच त्याने चांगला पगार असलेली नोकरीही मिळवली. मात्र त्याच्या दोन चुकांमुळे तो अडकला. सॅलरी अकाऊंट उघडताना तोमरने आपला जुनाच पॅनकार्ड क्रमांक वापरला. तसेच एलपीजी सिलिंडरचे पैसे भरण्यासाठी तोमर या बँक खात्याचा वापर करत होता. या दोन चुकांमुळे तोमर पंजाब पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
मूळचा उत्तर प्रदेशच्या कानपूरचा असलेला तोमर २०१३ साली पंजाबच्या अबोहर छावणीत तैनात होता. त्याने पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पत्नी श्वेता सिंहचा गळा दाबून खून केला. यानंतर ही आत्महत्या असल्याचे भासवले. मात्र पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर हा खून असल्याचे समोर आले.
आत्मसमर्पण न करता पळ काढला
२०१४ साली स्थानिक न्यायालयाने तोमरला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निर्णयानंतर तोमरला सैन्यातून बेदखल करण्यात आले आणि त्याची रवानगी फिरोजपूर तुरुंगात झाली. पाच वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. पुढे २०२२ साली उच्च न्यायालयाने पुन्हा त्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. परंतु तोमरने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले नाही.
तोमर फरार असल्यामुळे त्याचे सासरे राम नरेश यांनी २०२४ साली उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. उच्च न्यायालयाने पंजाबच्या पोलीस महासंचालकांना ८ एप्रिल २०२६ पूर्वी शपथपत्र दाखल करून तोमरच्या अटकेबद्दल कोणती करवाई केली, याबद्दल माहिती देण्यास सांगितली.
उच्च न्यायालयाच्या नोटीसीनंतर फाजिल्काच्या पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आणि फरार आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान एसआयटीने नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड (नॅटग्रिड) कडून मदत घेतली आणि तोमरला जारी केलेला पॅन क्रमांक शोधून काढला.
तोमरच्या पॅन नंबरशी संलग्न असलेल्या खात्यांची माहिती मागविण्यासाठी सर्व खासगी आणि सरकारी बँकांना नोटीस पाठवली गेली. यानंतर तोमर याचे एका खासगी बँकेत खाते असल्याची माहिती समोर आली. एका मोठ्या कंपनीमधून तोमरच्या खात्यात दरमहा वेतन जमा होत असल्याचेही समोर आले. याआधारे पोलिसांनी तोमरचा मोबाइल नंबर आणि इतर माहिती गोळा केली.
मात्र मोबाइल नंबरच्या टॉवर लोकेशनच्या आधारावर तोमरचे नेमके स्थान कळत नव्हते. मात्र भारत गॅस एजन्सीकडून त्याने गॅस सिलिंडर बुक केल्याची माहिती बँकेकडून मिळाली. यानंतर सदर गॅस एजन्सीला संपर्क करून डिलिव्हरीचा पत्ता पोलिसांनी काढला. ही माहिती पोलीस महासंचालकांना कळविल्यानंतर मध्यप्रदेशच्या पांढुर्णा जिल्ह्यातून अटक करण्यात आली.
