लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) पुरवठ्यातील अडचणी आणि संभाव्य तुटवड्याच्या मुद्द्यावर गुरुवारी संसदेत जोरदार गदारोळ झाला. विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करत संसदेच्या आवारात आंदोलन केले आणि या विषयावर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका करत देशातील गॅस पुरवठ्याच्या परिस्थितीवर संसदेत सविस्तर चर्चा घ्यावी, अशी मागणी केली. स्वयंपाक गॅसच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिकांसह छोटे उद्योगही अडचणीत येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद परिसरात फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली आणि केंद्र सरकारकडून एलपीजी पुरवठ्याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा परिणाम भारतातील एलपीजी पुरवठ्यावर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काही खासदारांनी लोकसभेमध्ये स्थगित प्रस्तावावर तातडीची चर्चा घ्यावी, अशी मागणी केली. देशात एलपीजीचा साठा किती आहे, पुरवठा कधी सुरळीत होणार आणि सरकार कोणती पावले उचलत आहे याबाबत माहिती देण्याची मागणी विरोधकांनी केली.
आंदोलन आणि चहाचा घोट
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अविश्वास प्रस्तावावर दोन दिवसांच्या चर्चेनंतर विरोधकांनी एलपीजी तुटवड्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला गुरुवारी घेरले. लोकसभेचे कामकाज सकाळी सुरू होताच याच मुद्द्यावरून विरोधक लोकसभेत आक्रमक झाले. सभागृह तहकूब झाल्यानंतर प्रामुख्याने काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या आवारात मकरद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये प्रियंका गांधीही सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर मकरद्वाराच्या पायऱ्यांवर काँग्रेसच्या निलंबित खासदारांनी आंदोलन केले. त्यावेळी हे खासदार ‘नरेंदर सरेंडर’ लिहिलेले फलक घेऊन निदर्शने करत होते. या आंदोलनामध्ये राहुल गांधींही सहभागी झाले. त्याचवेळी या खासदारांना चहा आणून दिला गेला, त्यांच्याबरोबर राहुल गांधी यांनी चहाचा पिऊन निदर्शनाला पाठिंबा दिला. या खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले आहे, त्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली जात आहे.
