LPU Protest Mall Looting Video : पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात रविवारी विद्यार्थ्यांनी हिंसक आंदोलन केलं. विद्यापीठातील विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्याची अफवा पसरल्यानंतर इथं विद्यार्थ्यांनी विद्यापिठाची नासधूस केली. यावेळचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विद्यार्थी युनी मॉलमधील दुकानांत घुसून वस्तू उचलताना दिसत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

फ्री शॉपिंग, शॉपिंग डन असा आवाजही या व्हिडिओंमधून येत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मॉलमधील विविध वस्तूंकडे बोट दाखवून, “तुम्हाला काय हवे आहे? आता सांगा, तुमच्यासाठी सर्व काही मोफत आणून देतो”, असं म्हणताना दिसत आहे. याशिवाय, इतर काही दृश्यांमध्ये कथितपणे विद्यार्थी मॉलमधील खाद्यपदार्थ खाताना दिसत आहेत, तर काही व्हिडिओंमध्ये आंदोलनादरम्यान दुकाने आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याचं दिसत आहे. या व्हिडिओंची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकलेली नाही. तसंच, वस्तू घेताना दिसणारे सर्व लोक एलपीयूचेच विद्यार्थी होते की नाही, हेही दृश्यांवरून स्पष्ट झालेले नाही.

एका विद्यार्थिनीवर झालेल्या कथित बलात्काराच्या दाव्यांवरून एलपीयूमधील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर ही लूटमार झाली. आंदोलकांनी मालमत्तेची तोडफोड केली, पोलिसांच्या वाहनांवर हल्ले केले आणि राष्ट्रीय महामार्ग-४४ (NH-44) रोखून धरला. पोलिसांनी सांगितलं की, रविवारी संध्याकाळी हायवेवरील नाकेबंदी हटवण्यास सांगितल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दोन पोलीस वाहने पेटवून देण्यात आली आणि इतर अनेक वाहनांचं नुकसान झालं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या चकमकीत अनेक पोलीस जखमी झाले आहेत. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंमध्ये कॅम्पस मॉलमधील दुकाने, एटीएम किओस्क आणि विद्यापीठाच्या इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याचंही दिसत आहे. काही आंदोलक चेहरे झाकून फिरताना दिसले.

पोलिसांनी सांगितलं की, कथित बलात्काराच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला असून एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. तपासाचा भाग म्हणून सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक नमुने आणि कॉल रेकॉर्ड तपासले जातील, असं तपासकर्त्यांनी सांगितलं.

१० दिवस लेक्चर्स बंद, परीक्षा पुढे ढकलल्या

एलपीयूने सोमवारपासून १० दिवसांसाठी वर्ग स्थगित केले आहेत आणि पुढील नोटीस येईपर्यंत मध्यावधी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. काही विद्यार्थ्यांनी लूटमार, जाळपोळ आणि तोडफोडीसाठी बाहेरील लोक जबाबदार असल्याचा आरोप केला असला, तरी पोलिसांनी सांगितले की हिंसेत सामील असलेल्या अनेक लोकांचे चेहरे झाकलेले होते. मॉलमधील लूटमार आणि नुकसानीमध्ये सामील असलेल्यांची अचूक ओळख सीसीटीव्ही फुटेज आणि पोलीस तपासाद्वारे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.