LPU Campus Protest: पंजाबमधील फगवाडा येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (LPU) विद्यार्थ्यांनी रविवारी पहाटे सोशल मीडियावरील एका विद्यार्थिनीवर झालेल्या कथित बलात्काराच्या दाव्यानंतर विद्यापीठाच्या मालमत्तेची तोडफोड केली आणि जालंधर-फगवाडा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्काराच्या कोणत्याही गुन्ह्याची त्यांच्याकडे माहिती नाही.
अफवांमुळे कॅम्पसमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे
कपूरथलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गौरव तुरा यांनी सांगितलं की, पहाटे १.४५ च्या सुमारास एलपीयू कॅम्पसमध्ये विद्यार्थी जमा झाले असून त्यांनी रस्ता रोखल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बलात्काराच्या या चुकीच्या दाव्यावर बोलताना तुरा म्हणाले, “आम्ही जेव्हा येथे पोहोचलो, तेव्हा समजलं की या केवळ अफवा होत्या. या अफवांमुळेच विद्यार्थी येथे एकत्र आले होते.”
सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंमध्ये विद्यार्थी खिडक्यांच्या काचा आणि कुड्यांचे नुकसान करताना दिसत होते, तर काही वस्तूंना आग लावल्याचेही पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांनी जालंधर-फगवाडा राष्ट्रीय महामार्गही रोखला होता.
विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनासमोर मांडल्या तक्रारी
एसएसपी तुरा यांनी सांगितलं की, पोलिसांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली, ज्यांनी एलपीयू प्रशासनाबाबत काही तक्रारी मांडल्या. या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. “आम्ही विद्यार्थ्यांशी बोललो, ज्यांना एलपीयू प्रशासनाकडून काही अडचणी होत्या. आम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे”, असं त्यांनी सांगितलं. तसंच, आपल्या तक्रारींचं योग्य निवारण केलं जात नसल्याचं विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितलं. मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन सुरू असून, आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असं तुरा यांनी स्पष्ट केले. विद्यापीठात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
चित्कारा युनिव्हर्सिटीतही झाले होते आंदोलन
कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थिनींनी कथितपणे आत्महत्या केल्याच्या सोशल मीडियावरील अफवांनंतर पतियाळामधील चित्कारा युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याची घटना ताजी असतानाच, दुसऱ्याच दिवशी ही नवी घटना घडली. त्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या गाडीचेही नुकसान केले होते.
