नवी दिल्ली : मुंबई पोलिसांनी दिलेल्या कथित वाईट वागणुकीबद्दल खासदार नवनीत राणा यांनी लोकसभाध्यक्षांकडे केलेल्या तक्रारीवर संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर २३ मे रोजी दुपारी १२ वाजता सुनावणी होणार आहे. समितीचे अध्यक्ष सुनील कुमार सिंह यांच्या उपस्थितीत राणा यांची चौकशी केली जाईल.

हनुमान चालिसा प्रकरणात लोकसभेतील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली होती. पोलिस कोठडीत असताना पोलिसांनी योग्य वागणूक दिली नाही, आपल्याला पिण्यासाठी पाणी दिले नाही, बाथरूमचा देखील वापर करू दिला नाही. आपण अनुसूचित जातीतून आल्यामुळे पोलिसांनी दुजाभाव केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून मुंबई पोलिसांवर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती.

या पत्राच्या आधारे लोकसभाध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे अहवाल मागितला होता. त्यानुसार, राज्य सरकार व मुंबई पोलिसांनी संसदेच्या विशेषाधिकार समितीला सविस्तर माहिती दिली असून त्या आधारे समितीसमोर सुनावणी केली जाणार आहे.

लोकसभाध्यक्षांची भेट : जामीन मिळाल्यानंतर राणा दाम्पत्य पहिल्यांदाच सोमवारी दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यांनी लोकसभाध्यक्ष बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पोलिसांनी केलेल्या अटक प्रकरणाची तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा यांच्याविरोधात केलेल्या टिप्पणीचीही माहिती दिली. राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मला उघडपणे धमकी दिली आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहे. मला राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून न्याय मिळण्याची आशा नाही, असे नवनीत राणा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती करणारे पत्रही राणा यांनी दिल्ली पोलिसांनाही लिहिले होते. मला पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दल बिर्ला यांनी दु:ख व्यक्त केले व कुठल्याही लोकप्रतिनिधीला अशा घटनांना सामोरे जावे लागू नये, अशा भावना बिर्ला यांनी व्यक्त केली, अशी माहिती नवनीत राणा यांनी बिर्ला यांच्या भेटीनंतर दिली.