वीरपत्नीचा लष्करात प्रवेश; ओटीएतील प्रशिक्षणानंतर लेफ्टनंटपदी नियुक्ती

पतीच्या जाण्याने संगीता या आतून खचल्या होत्या. मात्र, कुटुंबियांमुळे आणि मित्र परिवाराच्या पाठिंब्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा नव्याने जीवन सुरु करण्याचा निर्णय घेतला.

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या लष्कराच्या गोरखा रेजिमेंटचे रायफलमन शिशिर मल्ल यांच्या पत्नी संगीता यांचा लष्करात प्रवेश झाला आहे. ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांची लष्कारात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे.


पतीच्या जाण्याने संगीता या आतून खचल्या होत्या. मात्र, कुटुंबियांमुळे आणि मित्र परिवाराच्या पाठिंब्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा नव्याने जीवन सुरु करण्याचा निर्णय घेतला. नवी सुरुवात करताना संगीता यांनी स्पर्धा परिक्षांची तयारी सुरु केली. त्यानंतर त्यांची बँकेत निवड झाली. दरम्यान, संगीता यांना रानीखेत येथे सैन्याच्या एका कार्यक्रमात जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिथे शिशिर यांच्या मित्रांनी त्यांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीत (ओटीए) कसे जाता येईल हे देखील सांगितले.

सैन्याच्या कुटुंबियातून असल्याने संगीता यांनी देखील यासाठी तयारी दर्शवली. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या वीरनारी कमिटीच्या मदतीने ओटीएसाठी परिक्षेची तयारी सुरु केली. शिशिर यांच्या हौतात्म्यानंतर सुमारे तीन वर्षांनंतर त्यांच्या पत्नी संगीता चेन्नईतील ओटीएत प्रवेश मिळवला त्यानंतर खडतर प्रशिक्षणानंतर त्या आता सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत.

२ सप्टेंबर २०१५ रोजी रायफलमन शिशिर मल्ल बारामुल्लामध्ये शहीद झाले होते, ते ३२ राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात होते. शहीद होण्यापूर्वी त्यांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते. तर दुसऱ्याला जखमी केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Lt sangeeta mall wife of myrter shishir mall is commissioned into the indian army

ताज्या बातम्या