Lucknow Child Murder case : उत्तर प्रदेशातील अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय घटना घडली आहे. वडील आणि सावत्र आईने मिळून अवघ्या चार वर्षांच्या मुलाची निर्घुण हत्या केली. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या असून त्याला जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. मुलाच्या आजीने ही घटना पोलिसांना सांगितली. या प्रकरणी मुलाचे वडील भीष्म खरबंदा (३५) आणि त्याची दुसरी पत्नी रागिणी खरबंदा (३०) यांना पोलिसांनी अटक केली आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्नाव येथील सुधा कश्यप यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. १२ मार्च रोजी भीष्मने त्यांना नातू अर्णवच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. अर्णवच्या मृत्यूबाबत कळताच आजी लखनौच्या लाजपत नगरमधील घरी पोहोचल्या. तेव्हा नातूचा मृतदेह व्हरांड्यात ठेवलेला आढळला.
चिमुकल्याच्या शरीरावर खुणा
तक्रारीनुसार, मुलाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आणि जखमांचे निळे वळ होते. यावरून त्याला अमानुषपणे मारहाण केल्याचे दिसून येत होते. तसेच त्याच्या पायावर भाजल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला झाडू, वायपर, चाकू, पट्टी, बेल्ट आणि दोरी जप्त केली आहे.
मालमत्तेच्या हव्यासापोटी हत्या?
काही वर्षांपूर्वी अर्णवच्या जन्मदात्या आईचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. भीष्म आणि रागिणी यांनी मालमत्तेच्या हव्यासापोटी या चिमुरड्याची हत्या केल्याचा आरोप आजीने केला आहे. याप्रकरणी चौक पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
काही महिन्यांपूर्वीच उत्तर प्रदेशातील जिजोली गावात एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या १२ वर्षांच्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह ट्रंकमध्ये लपवून पळ काढला होता.
