उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये दिवसभर रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारा एक तरुण मोकळ्या वेळेत शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास करत आहे. आर्थिक अडचणींमुळे त्याला रिक्षा चालवण्याचं काम स्वीकारावं लागलं, मात्र शिक्षक होण्याचं स्वप्न त्याने सोडलेलं नाही. एका प्रवासी महिलेने त्याच्याशी साधलेल्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेक जण त्याच्या जिद्दीचं कौतुक करत आहेत. याबद्दलचे सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
रिक्षा चालवताना मोबाइलवर सुरू असतो अभ्यास
मल्लिका अग्रवाल रुपानी या लाइफस्टाइल कंटेंट क्रिएटरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या लखनौमध्ये प्रवास करत असताना त्यांना एक रिक्षाचालक रिक्षा चालवतानाच अभ्यास करत असल्याचं दिसलं. त्यांनी त्याला याबाबत विचारलं, “तुम्ही रिक्षा चालवताना काहीतरी अभ्यास करत आहात, नेमकी कोणत्या परीक्षेची तयारी सुरू आहे?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
त्यावर रिक्षाचालकाने आपण ‘सुपर टीईटी’ परीक्षेची तयारी करत असल्याचं सांगितलं. व्हिडीओमध्ये त्याच्या रिक्षात मोबाईल स्टँडवर ठेवलेला दिसतो. त्यावर अभ्यासाचा व्हिडीओ सुरू असतो. सुपर टीईटी ही उत्तर प्रदेशातील सरकारी शिक्षक भरतीशी संबंधित पात्रता परीक्षा आहे. या तरुणाचं नाव सूरज तिवारी असून तो अमेठीचा रहिवासी आहे. आपण डिसेंबर महिन्यात लखनौला आलो आणि तेव्हापासून परीक्षेची तयारी करत असल्याचं त्याने सांगितलं.
सीबीएसई शाळेत नोकरीचं स्वप्न; आर्थिक अडचणींमुळे रिक्षा चालवण्याचा निर्णय
सूरजला सुरुवातीला सीबीएसई शाळेत नोकरी मिळवायची होती. मात्र, त्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. घरची आर्थिक परिस्थितीही कठीण असल्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्याने रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. काम करतानाच परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवण्याचा निर्णय त्याने घेतला. रिक्षा चालवणं आणि अभ्यास करणं या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ कसा साधतो, असं मल्लिकाने त्याला विचारलं. त्यावर “मी सगळं सांभाळतो. माझी विचार करून समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता चांगली आहे. एखादी समस्या जितकी मोठी असते, तितका तिच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्याची संधी मला मिळते,” असं सूरज म्हणाला.
“मला बाईकवरून संपूर्ण जग फिरायचं आहे”
संवादादरम्यान सूरजने आपल्या आयुष्यातील आणखी एक स्वप्न सांगितलं. “माझ्या आयुष्यात एक स्वप्न आहे आणि ते म्हणजे बाईकवरून संपूर्ण जग फिरण्याचं. मी हे स्वप्न पूर्ण करू शकतो हे सर्वांना दाखवून देईन,” असं तो हसत म्हणाला.
मल्लिकाने हा व्हिडीओ शेअर करताना रोजच्या आयुष्यातही प्रेरणादायी कहाण्या दडलेल्या असतात असं म्हटलं आहे. “तो इतरांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचवण्यासाठी मदत करतोय आणि त्याच वेळी स्वतःच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठीही प्रयत्न करतोय,” अशा शब्दांत तिने सूरजच्या जिद्दीचं कौतुक केलं. तसेच त्याच्या परीक्षेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नेटकऱ्यांकडून सूरजच्या जिद्दीचं कौतुक
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सूरजच्या मेहनतीचं आणि चिकाटीचं कौतुक केलं आहे. आर्थिक अडचणी असूनही शिक्षणाची ओढ कायम ठेवणाऱ्या सूरजकडून प्रेरणा मिळत असल्याचं काहींनी म्हटलं. तर, त्याच्या डोळ्यांतूनच त्याची जिद्द दिसून येते, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली. रिक्षा चालवण्याच्या कामासोबत अभ्यास सुरू ठेवणाऱ्या सूरजच्या या प्रवासाला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
