उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये एका आंतरधर्मीय जोडप्याचा गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमित कुमार (वय २२) आणि नरगिस (वय १९) अशी मृतांची नावे असून, दोघेही हरदोई जिल्ह्यातील रहिवासी होते. दोघांचे मृतदेह चिनहट परिसरातील एका गेस्ट हाऊसच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. याबद्दल सविस्तर वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे.
२० दिवसांपासून गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अमित आणि नरगिस यांच्या नात्याला त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यानंतर दोघांनी हरदोईहून पळून लखनौ गाठल्याचे समोर आले आहे. २३ ऑगस्टपासून दोघे चिनहट येथील रेड बिल्डिंग गेस्ट हाऊसच्या रूम क्रमांक १०१ मध्ये राहत होते.
बुधवारी रात्री बराच वेळ खोलीचा दरवाजा बंद असल्याचे गेस्ट हाऊस कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. रात्री सुमारे ८ वाजता त्याने दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याने खिडकीतून पाहिले असता दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी दुसऱ्या चावीने उघडली खोली
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दुसऱ्या चावीच्या मदतीने खोली उघडण्यात आली. दोघांचे मृतदेह खाली उतरवून पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी लोहिया रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांनी छताच्या पंख्याला असलेल्या हुकला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला होता.
सापडले लग्नाचे प्रमाणपत्र
खोलीची झडती घेतल्यानंतर पोलिसांना आर्य समाज मंदिराकडून जारी करण्यात आलेले लग्नाचे प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे दोघांनी लग्न केल्याचेही तपासातून समोर आले आहे. याशिवाय खोलीत एक चिठ्ठीही सापडली. त्यामध्ये दोघांनी स्वतःच्या इच्छेने आत्महत्या करत असल्याचे नमूद केले असून, त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना त्रास देऊ नये, अशी विनंती केली आहे. या चिठ्ठीवर अमित आणि नरगिस या दोघांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नरगिस बेपत्ता झाल्यानंतर हरदोईत अपहरणाचा गुन्हा दाखल
दरम्यान, पोलिसांच्या तपासात या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळाले आहे. नरगिस बेपत्ता झाल्यानंतर हरदोईतील हरपालपूर पोलीस ठाण्यात तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हरदोई सोडल्यानंतर या जोडप्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे नरगिस बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती.
आता लखनौमधील गेस्ट हाऊसमध्ये दोघे सुमारे २० दिवस कसे आणि कोणाच्या मदतीने राहिले, तसेच हरदोईमध्ये दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्याशी या प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचा पोलिस तपास करत आहेत. मृत्यूमागील नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
