scorecardresearch

लखनऊ शहर हे पूर्वीचे लक्ष्मणनगरी, उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

लखनौचे नाव बदलण्याची मागणी भाजपचे खासदार संगमलाल गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केल्यानंतर उपमुख्यमंत्री पाठक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

dv lucknow city

पीटीआय, भदोही (उत्तर प्रदेश) : ‘‘लखनौ शहराचे पूर्वीचे नाव लक्ष्मणनगरी होते, हे सर्वज्ञात आहे. यासंदर्भात आगामी काळात राज्य सरकार परिस्थितीनुरूप कार्यवाही करेल,’’ असे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी बुधवारी सांगितले.

लखनौचे नाव बदलण्याची मागणी भाजपचे खासदार संगमलाल गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केल्यानंतर उपमुख्यमंत्री पाठक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गुप्ता यांनी लिहिले, की लखनौ हे सध्याचे नाव अठराव्या शतकात नवाब असफुद्दौला यांनी दिले. लखनौचे नाव लखनपूर किंवा लक्ष्मणपूर करावे. प्रभू श्रीरामांनी या शहराला आपला बंधू लक्ष्मणचे नाव दिले होते.

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या पुतळय़ाचे अनावरण करण्यासाठी भदौही येथे आलेल्या उपमुख्यमंत्री पाठक यांना याबाबतची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, की लखनौचे पूर्वीचे नाव ‘लक्ष्मणनगरी’ असल्याचे सर्वाना ठाऊक आहे. आम्ही परिस्थितीनुरूप या संदर्भातील निर्णय घेऊ. या शहराचे नाव बदलणार का, या प्रश्नावर पाठक म्हणाले, की असे काही असल्यास या संदर्भात आपल्याला कळवले जाईल.

अहमदाबादचे नाव ‘कर्णावती’ करा : अभाविपचा ठराव

अहमदाबाद : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) अहमदाबादचे नाव बदलून ‘कर्णावती’ करावे, या मागणीसाठी मोहीम सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. अहमदाबादचे नाव बदलून ‘कर्णावती’ करण्याची मोहीम सुरू करण्याचा ठराव मंगळवारी येथे अभाविपने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विद्यार्थी संमेलनात मंजूर करण्यात आला. अहमदाबादचे कर्णावती नामकरणासाठी येथे आयोजित विद्यार्थी संमेलनात उपस्थित पाच हजार विद्यार्थ्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. आम्ही जिल्हाधिकारी, संबंधित महसूल अधिकारी,  महाविद्यालयांचे प्राचार्य व आवश्यक तिथे या मागणीचे निवेदन देऊ, असे अभाविपच्या गुजरात सचिव युती गाजरे यांनी

पत्रकारांना सांगितले. गुजरातचे तत्कालीन उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी कायदेशीर अडथळय़ांवर मात करून, आवश्यक पाठिंबा मिळाल्यास भाजप सरकार अहमदाबादचे नाव बदलून ‘कर्णावती’ ठेवण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर सुमारे पाच वर्षांनी ही मागणी होत आहे. दरम्यान, काँग्रेसने दावा केला, की अहमदाबादचे नाव बदलण्याचा मुद्दा अभाविपने पंचायत कनिष्ठ लिपिकाची पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याच्या गंभीर प्रकरणापासून तरुणांचे लक्ष विचलित करण्यासाठी पुढे आणला आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याने ही परीक्षा अलीकडेच रद्द करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 00:02 IST