Lucknow mother boyfriend kills minor son : लखनऊमध्ये आईच्या प्रियकराकडून ६ वर्षांच्या मुलाची लाथा-बुक्क्यांनी आणि लोखंडी पळीने मारहाण करून हत्या करण्यात आली. आरोपी आणि मुलाच्या आईची सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंध होते. त्या दोघांमध्ये मुलाचा अडथळा निर्माण होत असल्यानं आरोपीने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीला अटक; आईवर एफआयआर
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी प्रशांत सिंग उर्फ गौरव सिंग (२६ वर्ष) याला सोमवारी अटक केली असून हत्येच्या दुसऱ्या दिवशी पळी हस्तगत केली आहे. मृत मुलाची आई पूनम देवी हिचेही नाव एफआयआरमध्ये नमूद केले असून पोलीस तपास करत आहेत.
इंस्टाग्रामवर ओळख
पोलीस अधिकारी शिवानंद मिश्रा यांनी सांगितले कि, आरोपी प्रशांत हा मूळचा अयोध्याचा असून तो कानपुरमध्ये मजुरी करतो. काही महिन्यांपूर्वी त्याची पूनम देवीशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पूनमचा पती कामानिमित्त बाहेर असताना प्रशांत त्यांच्या लखनऊच्या भाड्याच्या घरात येऊन राहत होता.
मुलगा ठरत होता अडथळा
चौकशी दरम्यान प्रशांत आणि पूनम एकांतात वेळ घालवत असताना मुलगा वारंवार अडथळा आणत होता. प्रशांत हा पूनमसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह धरत असल्याचे तपासात आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुलाची सतत मारहाण
पोलिसांच्या माहितीनुसार घटनेच्या ५ दिवस आधीपासून प्रशांत पूनमच्या घरी राहत होता. त्यादरम्यान पूनम कामावर गेल्यावर प्रशांत मुलाची सतत मारहाण करत असे. घटनेच्या दिवशी त्याने मुलाला लाथा-बुक्क्याने मारहाण केली तसेच लोखंडी पळीने वार केले त्यात मुलाचा मृत्यू झाला.
वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
मृत मुलाचे वडील दिनेश कुमार यांनी ५ जुलैला पोलिसात प्रशांत आणि पूनम देवी यांच्या विरोधात तक्रार केली. भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत दाखल करण्यात आला. प्रशांत याला माडियाव रेल्वे स्टेशन जवळून अटक करण्यात आली.
