लखनऊ : उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये २४ वर्षाच्या नवविवाहित महिलेचा तिच्या भाड्याच्या घरात मृतदेह आढळून आला आहे. काश्मीरला हनिमूनला जाण्यासाठीची विमानाची तिकिटे रद्द करून रेल्वेची तिकिटे बुक केल्याने तिच्यात व पतीमध्ये वाद झाला होता आणि त्यामुळे तिने आत्महत्या केली, असा दावा तिच्या पतीने केला आहे. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीसह कुटुंबातील सहा जणांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.
अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमोल मुर्कुट यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य मूळचे बिहारचे असून २६ फेब्रुवारीला त्यांचा विवाह झाला. तेव्हापासून ते लखनऊच्या शिवाजीपूरम, इंदिरानगर येथे राहत होते. पती हा एका खासगी बँकेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत पतीने सांगितले कि, कामात व्यस्त असल्यामुळे हनिमून पुढे ढकलण्यात आला. सुरुवातीला त्यांनी काश्मीरला जाण्यासाठी विमानाची तिकिटे काढली होती पण ती रद्द करून नंतर ३ जुलैला रेल्वेची तिकिटे काढली, यामुळे पत्नी नाराज झाली व त्यांच्यात वाद झाला.
घरात गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह
पतीच्या म्हणण्यानुसार ४ जुलै रोजी तो कामावर गेला होता. दिवसभर पत्नीशी संपर्क होत नसल्याने त्याने वारंवार फोन केला. प्रतिसाद न मिळाल्याने घरमालकाला बोलावण्यात आले. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याने तो उघडण्यात आला असता पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
कार आणि पैशांसाठी छळ
दरम्यान मृत महिलेच्या भावाने आरोप केला आहे कि, लग्नाच्या वेळी भरपूर प्रमाणात भेटवस्तू देऊनही तिचा वारंवार कार आणि पैशांसाठी छळ केला जात होता. तसेच, तिची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचण्यात आल्याचा आरोपही त्याने केला आहे.
रुग्णालयात नेण्याऐवजी मृतदेहाचे फोटो काढले
तक्रारदाराने असा आरोपही केला की, घटनेची माहिती कुटुंबीयांना उशिरा देण्यात आली. तसेच, पत्नीला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी तिच्या मृतदेहाचे फोटो काढण्यात आले.
पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी मृत महिलेचा पती, त्याचे आई-वडील, भाऊ, वहिनी आणि बहिणीवर हुंडाबळी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
