उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊ शहरामध्ये पत्नी आणि महिला बॉसमधील वाढती जवळीक आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. या तरुणाने आत्महत्येपूर्वी तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने सुसाइड नोट लिहून ठेवली आहे. यामध्ये त्याने पत्नी आणि तिच्या महिला बॉसमधील वाढती जवळीक हा माझ्यासाठी चिंतेचा विषय ठरत असून त्यामुळेच मी आत्महत्या करतोय असं म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सध्या तीन जणांविरोधात या तरुणाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करुन तपास सुरु केलाय.

निखिल कुमार असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव असून तो गोमती नगरमधील विराम खंड परिसरात वास्तव्यास होता. निखिल हा लखनऊमध्ये टाइपरायटर बाबा नावाने लोकप्रिय असणाऱ्या कृष्णा कुमार यांचा मुलगा होता. निखिलची पत्नी आणि तिच्या बॉसमधील जवळीक आणि संबंध या मुद्द्यावरुन दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. याच वादांना कंटाळून निखिलने आत्महत्या केलीय. निखिलने गोमती नगर पोलीस स्थानकातील निरिक्षक, सहाय्यक निरिक्षक आणि पोलीस अधिकक्षकांसाठी तीन वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहून आत्महत्या केलीय.

काय आहे नक्की प्रकरण?
तिन्ही चिठ्ठ्यांमध्ये निखिलने पत्नी अंजू गुप्तावर गंभीर आरोप केलेत. अंजू जेव्हापासून अहमामऊ कल्याणी उद्योग समूहाच्या कार्यालयामध्ये कामाला लागलीय तेव्हापासून आमच्या नात्यामध्ये कटूता निर्माण झाल्याचं निखिलने म्हटलं आहे. कंपनीचे व्यवस्थापक महिपाल आणि त्यांची पत्नी शशि किरण यांच्या संपर्कात आल्यापासून अंजू तिच्या सात वर्षांच्या वैष्णवी या मुलीसहीत घर सोडण्याचा हट्ट करत होती. अंजूला तिची महिला बॉस म्हणजेच शशि किरणसोबत तिच्या घरी जाऊन रहायचं होतं. आपली मागणी मान्य केली नाही तर आपण विष पिऊन आत्महत्या करु अशी धमकी अंजूने दिल्याचं निखिलने या चिठ्ठीत म्हटल्याचं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे.

या तिघांविरोधात गुन्हा दाखल…
रोजच्या या वादांना कंटाळून निखिलने गोमती नगरमधील आपल्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. निखिलचा मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने तीन चिठ्ठ्या सापडल्या असून या चिठ्ठ्यांच्या आधारे निखिलची पत्नी अंजू, तिची बॉस शशि किरण आणि शशिच्या पतीवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

निखिल टाइपरायटर बाबाचा मुलगा…
निखिलचे वडील हे लखनऊमधील एक लोकप्रिय व्यक्तीमत्व असून त्यांना टाइपरायटर बाबा नावाने ओळखलं जातं. २०१५ साली एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या टाइपरायटरला लाथाडून दिल्याचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते देशभरातील प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी राजशेखर आणि लखनऊचे एससपी राकेश पांडे यांनी पोलिसांच्या वतीने कृष्ण कुमार यांची माफी मागितली होती. तसेच त्यांना घरी जाऊन नवीन टाइपरायटर भेट दिला होता.