उत्तर प्रदेशच्या लखनौ येथे एका २१ वर्षीय मुलाने त्याच्या वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या वादानंतर त्याने बंदुकीने वडिलांच्या डोक्यात गोळी घातली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी स्वतःच्या वडिलांच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. ज्यापैकी काही त्यांने निळ्या ड्रममध्ये भरून ठेवले तर काही शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
या २१ वर्षीय तरूणाला सोमवारी अटक करण्यात आली असून त्याने गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्येची ही घटना २० फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास घडल्याचेही पोलिसांनी सांगितले.
मार्च २०२५ मध्ये गाजलेल्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाला जवळपास एक वर्ष पूर्ण होत असतानाच ही हत्येची घटना समोर आली आहे. त्या प्रकरणात २९ वर्षीय मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूत यांची त्यांची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी मेरठमध्ये हत्या केली होती.
दरम्यान वडिलांची हत्या केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या २१ वर्षीय अक्षतचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याला वडिलांची हत्येचे कारण विचारण्यात आले. ज्यावर तो “चुकून झाले होते (गलती से हो गया था)” असे उत्तर देताना दिसत आहे. तसेच या घटनेत बहिणीचा सहभाग होता का? असे विचारले असता तो मान हलवून नाही असे सांगताना दिसत आहे.
मुलाने बी.कॉम ऐवजी नीट (NEET) परीक्षेची तयारी करावी, यासाठी वडिलांनी त्याच्यावर दबाव टाकत होते आणि त्यावरून झालेल्या वादातून हा गुन्हा घडल्याचे पोलिसांनी सुरुवातीला सांगितले होते. मात्र, सिंह कुटुंबाच्या झवळच्या लोकांनी आणि शेजाऱ्यांनी पोलिसांचे हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
नेमकं काय घडलं?
मानवेंद्र सिंह हे तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या मुलाने दिली होती. पोलिसांनी २१ वर्षीय अक्षत सिंह याला विसंगत जबाब दिल्यानंतर अटक केली आणि त्याच्या चौकशीमधून ही घटना उजेडात आली, अशी माहिती डीसीपी विक्रांत वीर यांनी दिली आहे.
हत्येची घटना ही अक्षतची ११वीत शिकणाऱ्या धाकट्या बहिणीच्या समोर घडली. अक्षतने तिला कथितपणे कोणाला सांगितलं तर गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली होती. बहिणीने सर्वकाही पाहिले मात्र भीतीपोटी ती गप्प राहिली असे पोलिसांनी सांगितले.
आशियाना पोलीस ठाण्याचे एसएचओ छत्रपाल यांनी सांगितले की, पुरावे नष्ट करण्यासाठी अक्षतने मृतदेह तिसऱ्या मजल्यावरून ओढत तळमजल्यावरील एका रिकाम्या खोलीत आणला. तिथे त्याने मृतदेहाचे तुकडे केले.
“पुरावे नष्ट करण्यासाठी, अक्षतने मृतदेह तिसर्या मजल्यावरून तळ मजल्यावरील रिकाम्या खोलीत आणला. तेथे त्याने घरातील काही साधने वापरून त्याचे तुकडे केले. त्याने काही अवयव त्याच्या कारमध्ये टाकले आणि सदरौना येथील निर्जन ठिकाणी गेला आणि तेथे ते फेकून दिले,” असे त्यांनी सांगितले.
धड आणि डोके हे एका निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरले. या दोन्हीची विल्हेवाट अक्षत नंतर लावणार होता, पण त्याआधीच त्याला पकडण्यात आले.

