Lucknow Hit and Run Case Viral Video: लखनौमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रियकर आणि प्रेयसीचा वाद झाल्यानंतर प्रियकराने थेट प्रेयसीच्या अंगावर गाडी चढवत तिला काही अंतर फरफटत नेल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे नाव अनामिका असून तिच्या प्रियकराचे नाव शाहनवाज असल्याचे सांगितले जाते. शाहनवाज दुसऱ्या महिलेबरोबर दिसल्यानंतर संतापलेल्या प्रेयसीने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यानंतर प्रियकराने तिच्या अंगावर गाडी चढवली. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंडिया टुडेने यासंदर्भात बातमी दिली आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनामिका शाहनवाजच्या गाडीसमोर उभी राहून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी त्याने अचानक गाडी सुरू केल्यामुळे ती बोनेटवर पडते. काही काळ बोनेटला धरून पुढे गेल्यानंतर शाहनवाज गाडीचा वेग वाढवतो आणि अनामिका बाजूला फेकली जाते. त्यानंतर गाडी वेगात पुढे निघून जाते.

गाडी निघून गेल्यानंतर रस्त्यावरील प्रत्यक्षदर्शी महिलेच्या मदतीसाठी धावतात. या घटनेत अनामिका जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. “तुला जे काही करायचे आहे ते कर, पण आधी गाडी थांबव”, असे अनामिका ओरडून सांगत असल्याचे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे.

प्राथमिक तपासात असे आढळून आले की, अनामिका आणि शाहनवाज एकमेकांना काही काळापासून ओळखत होते. अनामिकाने आरोप केला की, शाहनवाजने त्याचे नाव यश ठाकूर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. बुधवारी सकाळी अनामिकाने एका पार्कजवळ शाहनवाजला एका महिलेबरोबर चहा पिताना पाहिले. यानंतर तिने त्याला जाब विचारताच तो कारमध्ये बसून पळून जाऊ लागला.

पोलिसांनी सांगितले की, अनामिका सध्या रुग्णालयात उपचार घेत असून तिने शाहनवाजच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून अनामिकाने केलेल्या आरोपांचीही चौकशी केली जात आहे. शाहनवाजने आपली ओळख लपवली होती का? या दाव्याचीही पडताळणी केली जात आहे.

गुरुग्रामच्या हिट-अँड-रनची आठवण

गुरुग्राममध्ये काही दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वार महिलेला कारचालकाने धडक दिल्याची घटना चर्चेत आहे. याही घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ३३ वर्षीय कल्याण बैंसला आणि त्याचा चुलत भाऊ लवनीशने गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवर सिया नावाच्या महिलेच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन पळ काढला होता.