उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पत्नीने प्रियकर आणि त्याच्या मित्राबरोबर मिळून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोहनलालगंज परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात महिलेचा प्रियकर मुन्ना उर्फ मुच्छड (५२), त्याचा मित्र मोहम्मद इक्बाल उर्फ वसीर अहमद (४०) आणि मृताची पत्नी अशा तिघांना अटक केली आहे. महिलेच्या पहिल्या पतीपासून असलेल्या १६ वर्षीय मुलाला पुरावे लपवल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

पतीला मिळाली पत्नीच्या अनैतिक संबंधांची माहिती

मृत राम किशोर वाल्मीकी हा मजूर असून दुबग्गा परिसरात राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि राम किशोर यांच्यात सुमारे चार वर्षांपासून संबंध होते. दोघांनी दोन वर्षांपूर्वी लग्न केले होते आणि त्यानंतर ते एकत्र राहत होते. मात्र, राम किशोरला पत्नीचे मुन्नाबरोबर संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. राम किशोरने त्याची पहिली पत्नी कविता देवी हिच्याकडे पुन्हा जाणे आणि तिला आर्थिक मदत करणे सुरू केले होते. त्याच्या दुसऱ्या पत्नीला याचा विरोध असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पहिल्या पत्नीने दिली तक्रार

राम किशोर बेपत्ता झाल्यानंतर त्याची पहिली पत्नी कविता देवी हिने पोलिसांत तक्रार दाखल केली. तिने हत्येचा आणि मृतदेह लपवल्याचा आरोप करत राम किशोरच्या दुसऱ्या पत्नीवर संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांच्या तपासानुसार, महिलेने प्रियकर मुन्ना आणि त्याचा मित्र इक्बाल यांच्यासह राम किशोरच्या हत्येचा कट रचला. १४ आणि १५ सप्टेंबरच्या मध्यरात्री महिलेने दोघांना आपल्या घरी बोलावले आणि दरवाजाची कडी उघडी ठेवली. त्यानंतर दोघे घरात शिरले आणि झोपलेल्या राम किशोरवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात राम किशोरचा मृत्यू झाला.

मृतदेह पेटीत लपवून पलंगाखाली ठेवला

खुनानंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. घरातील जमिनीवर सांडलेले रक्ताचे डाग झाकण्यासाठी त्यावर प्लास्टर अंथरण्यात आले होते. यानंतर महिलेने आपल्या मुलाला बोलावून, दोघांनी मिळून राम किशोरचा मृतदेह एका लाकडी पेटीत टाकला आणि तो पलंगाखाली लपवून ठेवला. हत्येसाठी वापरल्याचा संशय असलेला चाकू, रक्ताचे डाग असलेली झाडू घरात लपवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुसऱ्या रात्री ई-रिक्षातून मृतदेहाची विल्हेवाट

खुनानंतरच्या रात्री आरोपींनी मृतदेह ई-रिक्षात टाकला आणि घरापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका कालव्याच्या पुलाखाली तो फेकून दिला. मोहनलालगंज भागातील कालव्याजवळ तीन दिवसांपूर्वी पोलिसांना एका इसमाचा मृतदेह आढळला होता, जो नंतर राम किशोर वाल्मीकी असल्याचे निष्पन्न झाले.

या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी स्थानिक गुप्तचर यंत्रणेची मदत घेतली. तसेच मृतदेह नेण्यासाठी वापरलेल्या ई-रिक्षाने ज्या मार्गाने प्रवास केला, त्या मार्गावरील सुमारे १८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. या तपासातून आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी हत्येतील शस्त्र आणि मृतदेह वाहून नेण्यासाठी वापरलेली ई-रिक्षाही जप्त केली आहे.

तिघे न्यायालयीन कोठडीत, अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी

लखनौचे पोलीस उपायुक्त मोहम्मद मुश्ताक यांनी सांगितले, “मुन्ना, मृताची पत्नी आणि मोहम्मद इक्बाल यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. महिलेच्या १६ वर्षीय मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. बोर्डाने त्याला सुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले.