Lucknow Kanpur Expressway Damage: हजारो कोटी रुपये खर्चून लखनौ-कानपूर महामार्गाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र लोकार्पण झाल्यानंतर तीनच आठवड्यात महामार्गावर खड्डे आणि पृष्ठभाग वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक एकाच लेनने सुरू आहे. तर उन्नाव येथे सुरू असलेल्या दुरुस्तीमुळे वाहनांना माघारी फिरावे लागत आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता जिथे नुकसान झाले आहे, त्या भागाची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच काम पूर्ण होईपर्यंत संपूर्ण महामार्गावरील टोल वसुली थांबवली आहे. तसेच महामार्गाचे काम करणारे कंत्राटदार पीएनसी इन्फ्राटेक, तसेच रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी असलेले अभियंते आणि प्रकल्प अधिकारी यांच्याविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या महामार्गाच्या बांधकामासाठी ४,२०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. १३ जुलै रोजी वाहतुकीसाठी महामार्ग खुला करण्यात आला. लखनौ ते कानपूरपर्यंतचा प्रवास सहज व्हावा, यासाठी महामार्गाचे निर्माण करण्यात आले होते. महामार्गाचे लोकार्पण केल्यानंतर २६ जुलै रोजी अवघ्या १३ दिवसानंतर महामार्गावर खड्डे पडल्याचे पहिले वृत्त समोर आले.
४ ऑगस्टपर्यंत या महामार्गावर सहा ठिकाणी रस्ता खचण्याच्या घटना घडल्या. एकेठिकाणी रस्ता खचल्यामुळे एक ट्रक उलटला होता. एनएचएआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, महामार्गाच्या १२० मीटर पट्ट्यातच रस्ता खचण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर सुमारे १०० मीटर डांबरी पृष्ठभागाची दुरुस्ती पूर्ण झाली असून २० मीटर भागाचे पूर्णपणे उत्खनन करून त्याची पुनर्बांधणी करण्यात येत आहे.
पण एनएचएआयचा दावा इथेच फोल ठरला असून आणखी ३०० मीटर रस्त्याच्या आत पाणी शिरल्यामुळे तो भाग खचल्याचे समोर आले आहे. यामुळे हा संपूर्ण रस्ता पुन्हा खोदून त्याची पुनर्बांधणी करावी लागणार आहे.
अखिलेश यादव यांची टीका
समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी महामार्गाच्या दुरुस्तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. ज्या महामार्गाचे काही दिवसांपूर्वी निर्माण करण्यात आले, त्याची दुरुस्ती महिन्याभरातच करण्याची वेळ का आली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ये है भाजपाई तरक़्क़ी की नई हवा… कुछ दिनों पहले ही जिसका उद्घाटन हुआ हो उस सड़क को मरम्मत की ज़रूरत पड़ गई और एक्सप्रेस स्पीड से मरम्मत को सुखाने के लिए पंखे का इस्तेमाल किया जा रहा है ये भी हास्यास्पद है। 2-3 हफ़्ते में ही जिस एक्सप्रेसवे का दम उखड़ने लगा है उस पर चलने का जोखिम… pic.twitter.com/zfoydUzRAL
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 6, 2026
रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतर त्यावरील डांबर सुकण्यासाठी पंखे लावल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अवघे ६४ किमी अंतर असलेल्या महामार्गावर ठिकठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे. तेथील डांबर लवकर सुकावे यासाठी पंखे लावण्यात आले आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अखिलेश यादव यांनीही तो शेअर केला आहे.
