लखनौमध्ये मोबाईल फोनचा ईएमआय भरता न आल्याने एका तरुणाला फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने रक्तदान करण्यास भाग पाडले आणि त्यानंतर चार दिवस घरकाम करण्यासाठी डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लखनौ पोलिसांनी खासगी फायनान्स कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. आणखी एक कर्मचारी फरार असून त्याच्यावर २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

लखनौचे दक्षिण विभागाचे पोलिस उपायुक्त मोहम्मद मुश्ताक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिकेत सिंह आणि सुशांत शर्मा अशी आहेत. तर शुभम सिंह हा आरोपी अद्याप फरार आहे.

२१ हजार ५०० रुपयांचा मोबाईल ईएमआयवर घेतला

पोलिसांच्या तपासानुसार, लखनौच्या बाहेरील निगोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजारामखेडा गावातील नेवाल याने जुलैच्या अखेरीस स्थानिक दुकानातून २१ हजार ५०० रुपयांचा मोबाईल फोन खरेदी केला होता. या फोनसाठी गोमती नगर परिसरातील खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेण्यात आले होते. त्यासाठी एका वर्षासाठी दरमहा २ हजार ७९९ रुपयांचा ईएमआय ठरवण्यात आला होता. नेवालकडे नोकरी किंवा उत्पन्नाचे कोणतेही साधन नसतानाही त्याला कर्ज देण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. मात्र तो पहिलाच ईएमआय भरू शकला नाही.

घरातून जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप

नेवालच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ८ सप्टेंबर रोजी काही जणांनी आपल्या मुलाला जबरदस्तीने घरातून घेऊन गेल्याचे तिने तक्रारीत म्हटले. या तक्रारीनंतर १४ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.

रक्तपेढीत नेऊन रक्तदान करण्यास भाग पाडले?

पोलिसांच्या माहितीनुसार, ईएमआयच्या वसुलीसाठी अनिकेत आणि फरार आरोपी शुभम नेवालच्या घरी गेले. त्यानंतर त्यांनी त्याला जबरदस्तीने सोबत नेले. नेवालला एका रक्तपेढीत नेऊन एक युनिट रक्तदान करण्यास भाग पाडण्यात आले आणि त्यातून मिळालेली रक्कम वसूल करण्यात आली, असा आरोप आहे.

चार दिवस घरकाम करण्यासाठी डांबून ठेवल्याचा आरोप

रक्तदान केल्यानंतर नेवालला शुभमच्या घरी नेण्यात आले. तेथे त्याला चार दिवसांहून अधिक काळ डांबून ठेवण्यात आले आणि घरातील कामे करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नेवालला सोडण्यापूर्वी आरोपींनी त्याच्या भावाकडून, राजकुमारकडून एका महिन्याचा ईएमआयही वसूल केला. तपासादरम्यान पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि इतर वैज्ञानिक पुराव्यांचा वापर करून आरोपींची ओळख पटवली. दोघांना अटक करण्यात आली असून शुभम सिंहचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी फायनान्स कंपनी आणि संबंधित रक्तपेढीविरोधातही तपास सुरू केला आहे. या दोघांचा या प्रकाराशी संबंध असल्याचे पुरावे मिळाल्यास त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाईल, असे पोलिस उपायुक्त मोहम्मद मुश्ताक यांनी सांगितले.