Coronavirus: रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टर, कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; मृतदेह घेऊन नातेवाईक पसार

उत्तर प्रदेशच्या राजधानीमधील धक्कादायक घटना

Coronavirus last Phone call
प्रातिनिधिक फोटो (सौजन्य: रॉयटर्स)

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मागील काही दिवसांपासून करोनाबाधित नवीन रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण चिंतेत भर टाकणारे आहे. करोनामुळे दिवसाला तीन हजारांहून अधिक जणांचा देशामध्ये मृत्यू होत आहे. करोनामुळे रुग्ण मरण पावल्यानंतर काही ठिकाणी नातेवाईक डॉक्टरांवरच संताप व्यक्त करताना दिसत आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये मागील काही महिन्यांमध्ये डॉक्टरांवर हल्ला होण्याचे आणि रुग्णालयाची तोडफोड करण्याचे प्रकार समोर आलेत. नुकतेच असेल एक प्रकरण उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊमध्ये समोर आलं. येथील एका रुग्णालयामध्ये तरुणीचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांना डॉक्टरांना मारहाण केली. इतकच नाही तर करोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करत या तरुणीचा मृतदेह गाडीत टाकून हे नातेवाईक पसार झालेत.

नक्की वाचा >> “अ‍ॅलोपॅथी डॉक्टर राक्षसांपेक्षाही वाईट”; भाजपा आमदाराकडून बाबा रामदेव यांचं समर्थन

लखनऊमधील अ‍ॅडव्हान्स न्यूरो अ‍ॅण्ड जनरल हॉस्पिटलमध्ये सुनील मिश्रा नावाच्या व्यक्तीने त्याची पत्नी शैला मिश्रा यांना उपचारांसाठी दाखल करण्यासाठी घेऊन गेले होते. शैला यांची परिस्थिती इतकी चिंता जनक होती की त्यांच्या चाचण्यानंतर सीटी स्कोअर २५ ते २२ दरम्यान आला होता. अशा परिस्थितीमध्ये शैला यांना दाखल करुन घेण्यास आधी नकार दिला. मात्र करोना रुग्णांना दाखल करुन घेण्याच्या नियमांनुसार डॉक्टरांनी शैला यांच्यावर उपचार केले. मात्र २५ मे रोजी शैला यांचा मृत्यू झाला. शैला यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात जाऊन गोंधळ घातल्याचं आजतकने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. रुग्णालयातील डॉक्टर, साफसफाई कर्मचारी, नर्सला या नातेवाईकांनी मारहाण केली. रुग्णालयातील रिसेप्शनिस्टसोबतही या लोकांनी वाद घातला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना फोन केला.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही असा आरोप केला जातोय. पोलीस केवळ उभं राहून घडणारा प्रकार पाहत होते आणि रुग्णाचे नातेवाईक गोंधळ घालत होते असा आरोप रुग्णालय प्रशासनाने केलाय. धक्कादायक बाब म्हणजेच एवढ्या गोंधळानंतर नातेवाईक शैला यांचा मृतदेह गाडीमधून स्वत:सोबत घेऊन गेले. करोना नियमांनुसार शैला यांचा मृतदेह सील करण्यात आला नव्हता. मात्र त्यांच्या नातेवाईकांने सर्व नियमांचे उल्लंघन करत मृतदेह घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणात शैला यांच्या नातेवाईकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. २४ जणांविरोधात डॉक्टरांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास हाती घेतला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत.

शैला यांच्या नातेवाईकांपैकी अनेकांनी मद्यपान केल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केलाय. दारुच्या नशेतच या लोकांनी मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. १३ दिवसांनंतर आम्ही पुन्हा मारहाण करण्यासाठी येऊ आणि चौकात नेऊन लटकवू अशी धमकीही या लोकांनी दिल्याचं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lucknow uttar pradesh corona doctors beaten by covid patient relatives scsg

Next Story
फेलिक्स बॉमगार्टनर
ताज्या बातम्या