प्रयागराजमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात एका मुलीची बरीच चर्चा झाली होती. तिचे फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले होते. या मुलीचं नाव म्हणजे मोनालिसा भोसले. मोनालिसा या वर्षी पुन्हा चर्चेत आली. याचं कारण म्हणजे तिने मुस्लिम प्रियकराशी केलेलं लग्न. तिच्या लग्नावरुन राजकारण आणि आरोप प्रत्यारोप इतके वाढले की हे प्रकरण केरळच्या न्यायालयात गेलं. केरळ कोर्टाने मोनालिसाला तुझं नशीब समज तू केरळमध्ये आहे असं म्हटलं आहे. कोर्टात काय घडलं आणि न्यायालयाने असं का म्हटलंय आपण जाणून घेऊ.
मोनालिसाच्या लग्नावरुन आरोप प्रत्यारोप काय?
मोनालिसाने मुस्लिम प्रियकराशी लग्न केलं आणि तिने पतीसह पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. विवाहानंतर मोनालिसाचे वडील जयसिंग भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला की त्यांच्या मुलीला फसवून अडकवण्यात आले असून हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम तरुणाने त्यांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून विवाह केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांना विनंती केली की मोनालिसाला सुरक्षितपणे मध्य प्रदेशात परत आणावे. मोनालिसा भोसले आणि तिचा पती फरमान खान यांनी सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. तिरुवनंतपुरम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की त्यांचा विवाह पूर्णपणे परस्पर संमतीने झाला आहे. धर्मांतर किंवा कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. विवाहानंतर दोघांनीही आपला धर्म बदललेला नाही, तसेच त्यांच्या नात्यात धर्म हा कधीही अट नव्हता, असे त्यांनी सांगितलं होतं. मोनालिसाने म्हटलं होतं की हा तिचा स्वतःचा निर्णय आहे आणि विवाह हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडला आहे. आता यावरुनचा वा केरळ न्यायालयात पोहचला.

केरळ न्यायालयाने काय म्हटलं आहे?
मोनालिसा आणि फरमान खान यांच्या लग्नावर लव्ह जिहादचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे या दोघांनीही कारवाई होऊ नये म्हणून त्यांचीही याचिका दाखल केली आहे. दोन्ही पक्षांकडून न्यायालयात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर मंगळवारी केरळ न्यायालयाचे न्यायाधीश कौसर एडप्पागथ मोनालिसाला म्हणाले तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्ही केरळमध्ये आहात. कौसर एडप्पागथ यांनी ही प्रतिक्रिया दिली कारण मोनालिसा आणि फरमानच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की मोनालिसाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, तसंच तिला मानसिक त्रास दिला जातो आहे. त्यावर न्यायाधीश तातडीने म्हणाले की नशीब समजा की तु्म्ही दोघंही केरळमध्ये आहात. यानंतर मोनालिसा आणि फरमानचे वकील म्हणाले की हेच कारण आहे ज्यामुळे मोनालिसा आणि फरमान जिवंत आहेत.
मोनालिसाच्या आई वडिलांचे आरोप नेमके काय?
फरमान खानने आमच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिच्याशी लग्न केलं, आम्हाला हे लग्न मान्य नाही.
मोनालिसा आणि मला केरळमध्ये बोलवण्यात आलं. इथून थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथे सांगण्यात आलं की तुम्ही यांच्या निर्णयाच्या आड येऊ नका हे दोघं लग्न करणार आहेत असं मोनालिसाचे वडील जय सिंग भोसले म्हणाले.
मोनालिसा आणि फरमानचं लग्न हे लव्ह जिहादचं प्रकरण आहे असाही आरोप मोनालिसाच्या वडिलांनी केला.
मोनालिसाला फसवून तिचं लग्न केलं गेलं तिला परत घरी आणलं जावं अशी मागणी तिच्या आईने केली आहे. तसंच हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचंही म्हटलंय.
फरमान खानच्या वडिलांचं काय म्हणणं आहे?
फरमान केरळमध्येच असतो, बागपत या ठिकाणी कधीतरीच येतो. मोनालिसा नावाच्या मुलीशी त्याची मैत्री आहे ते दोघं चित्रपटात काम करणार आहेत हेच माहीत होतं.
फरमान खानने मोनालिसाशी लग्न केलं ही बाब मला मुळीच मान्य नाही. आमच्या धर्मातल्या मुलीशी लग्न आम्ही ठरवत असतो. मोनालिसा आणि फरमानचं लग्न मला मुळीच मान्य नाही.
मी या लग्नामुळे मुळीच आनंदी नाही. मोनालिसा हिंदू आणि आम्ही मुसलमान जाट आहोत. या लग्नामुळे आमच्या कुटुंबात अडचणी येतील.

मोनालिसा भोसलेने काय म्हटलं होतं?
माझं जे लग्न झालं आहे ते हिंदू रिती रिवाजाने झालं आहे. माझा प्रियकर फरमान माझ्याशी लग्न करु इच्छित नव्हता. पण मीच त्याला सांगितलं की आपण लग्न करु. माझे आई वडील दुसऱ्या मुलाशी माझं लग्न लावून देणार होते. मला तो मुलगा पसंत पडला नाही. ज्या मुलाशी माझं लग्न लावून देणार होते तो माझ्या आत्याचा मुलगा होता. तो माझा भाऊ आहे, मी त्याच्याशी लग्न कसं करणार? माझे वडील आले आहेत. पण ते आमच्या लग्नाला आले नव्हते. त्यांना हे माहीत आहे की आम्ही लग्न केलं आहे. ते थोडे नाराज आहेत. मी हिंदू रिती रिवाजाने लग्न केलं आहे. माझं लग्न म्हणजे लव्ह जिहाद नाही. मी सगळ्या धर्मांना मानते. मी लग्न केलं आहे हा लव्ह जिहाद नाही असं मोनालिसा भोसलेने म्हटलं होतं
