Lufthansa flight cancellations and fuel price hike impact on global aviation sector updates : अमेरिका आणि इराण यांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, ज्यामुळे विमान कंपन्यांना त्यांच्या उड्डाणांचा वेळापत्रकाचा नव्याने विचार करावा लागत आहे. यातच लुफ्थांसा ग्रूपने मोठा निर्णय घेतला आहे. युरोपातील या दिग्गज विमान कंपनी असलेल्या या समूहाने या उन्हाळ्यात आपल्या जवळपास २० हजार कमी अंतराची विमान उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानांच्या इंधनाच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे खर्च कमी करणे आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे समूहाच्या क्षमतेमध्ये १ टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात किरकोळ घट होणार आहे. ही क्षमता उपलब्ध सीट किलोमीटर (ASK) मध्ये मोजली जाते. मात्र, असे असले तरी, या निर्णयाचा खर्चावर होणारा परिणाम हा मोठा आहे. लुफ्थांसाने व्यक्त केलल्या अंदाजानुसार, या निर्णयामुळे ऑक्टोबरपर्यंत ४० हजार मेट्रिक टनपेक्षा जास्त विमान इंधनाची बचत होईल.
दरम्यान कंपनने हा निर्णय घेण्याचे मुख्य कारण हे इंधनाचे दर हे आहे, जे अमेरिका-इराण संघर्ष सुरू झाल्यापासून दुपटीने वाढले आहेत. विमान कंपनीच्या खर्चात जेट फ्युएलचा हिस्सा सर्वाधिक असतो, त्यामुळे अनेक कमी अंतरावरील विमान उड्डाणे ही कंपनीसाठी व्यवहार्य राहिलेली नाहीत.
याचा सामना करण्यासाठी फायदा मिळत नसलेल्या मार्गांवरील उड्डाणे कंपनीकडून बंद केली जात आहेत. विशेषतः फ्रँकफर्ट आणि म्युनिक या त्यांच्या मुख्य केंद्रांमधून होणारी विमान उड्डाने कमी केली जात आहे.
विमान कंपनी समूहाने स्पष्ट केले आहे की, ही रणनीती जागतिक स्तरावरील आपला अस्तित्व कमी करण्यासाठी नसून कार्यक्षमता वाढवण्यासाठी आखण्यात आली आहे.
काही मार्गांवरील उड्डाने स्थगित केली असली तरी, लुफ्थांसा त्यांच्या सेवाचा झुरिच, व्हिएन्ना आणि ब्रुसेल्ससारख्या ठिकाणी विस्तार देखील करत आहे. ज्यामुळे समूहाला त्यांच्या ग्लोबल नेटवर्कचा, विशेषतः लांब पल्ल्याच्या मार्गांवर ताबा परत मिळवण्यात मदत होईल.
रिस्ट्रक्चरिंगची ही प्रक्रिया लुफ्थांसाच्या फ्रँकफर्ट, म्युनिक, झुरिच, व्हिएन्ना, ब्रुसेल्स आणि रोम या सहा प्रमुख केंद्रांवर राबवली जात आहे. यामध्ये लुफ्थांसासह, स्वीस, ऑस्ट्रियन एअरलाईन्स, ब्रुसेल्स एअरलाईन्स आणि आयटीए (ITA) एअरवेज यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांचा समावेश आहे.
या बदलांचा पहिला टप्प्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार, ३१ मे पर्यंत दररोज सुमारे १२० विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि संबंधित प्रवाशांना त्याबाबत सूचित केले जात आहे.
