जम्मू-काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये झालेल्या बनावट चकमक प्रकरणातील पाच दोषी भारतीय जवानांची जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. सशस्त्र दल लवादाने बुधवारी या संदर्भातील निर्णय दिला. २०१४ साली लष्कराकडून या पाच जवानांवर कोर्टमार्शलची कारवाई करण्यात आली होती. यामध्ये पाच जणांमध्ये कर्नल आणि कॅप्टन पदावरील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या सर्वांनी शौर्यपदक मिळवण्यासाठी २०१० साली माछिल सेक्टरमध्ये दहशतवादी असल्याचे भासवून तीन काश्मिरी नागरिकांना मारले होते. या प्रकरणी लष्करी न्यायालयाने या पाचही जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

२०१० साली रफियाबाद येथील शहजाद खान, शफी लोन आणि रियाझ लोन या तीन नागरिकांना आमिष दाखवून कुपवाडामधील भारतीय सैन्याच्या तळावर बोलवण्यात आले होते. त्यानंतर २९ आणि ३० एप्रिल रोजी नियंत्रण रेषेलगतच्या सोनापिंडी परिसरात झालेल्या चकमकीत हे तिघेही मारले गेले होते. हे तिघेही पाकिस्तानमधून आलेले दहशतवादी होते व भारतीय हद्दीत घुसखोरी करताना मारले गेल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. त्यानंतर नियंत्रण रेषेलगत असलेल्या कब्रस्तानात त्यांचे मृतदेह गाडण्यात आले होते. हे तिघेजण दहशतवाही आहेत हे भासवण्यासाठी जवानांकडून शफी लोनचा चेहरा काळ्या रंगाने रंगवण्यात आला. त्याच्या चेहऱ्यावर दाढी आहे, हे दाखवण्यासाठी हा उपद्व्याप करण्यात आला होता. त्यानंतर या तिघांची छायाचित्रे काढून ती लष्कराकडे पाठवण्यात आली होती. मात्र, या तिघांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे ते हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. त्यासाठी या तिघांचे कब्रस्तानात गाडलेले मृतदेह पुन्हा उकरून बाहेर काढण्यात आले. तेव्हा तिघांच्याही कुटुंबियांनी हे मृतदेह आपल्याच नातेवाईकांचे असल्याचे सांगितले होते. यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात आंदोलनाचा भडका उडाला होता. तेव्हा सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली होती. या चौकशीमध्ये ४ राजपुत रायफल्सचे कर्नल दिनेश पठानिया, कॅप्टन उपेंद्र, हवलदार देवेंद्र कुमार, लान्स नायक लख्मी, लान्स नायक अरूण कुमार हे पाच जण दोषी आढळले होते.