Madan Mitra ED Notice: विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली. फुटीर आमदारांनी विधानसभेत ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट स्थापन केला आहे. पक्षाच्या अनेक लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी देखील ममतांची साथ सोडली आहे. बुधवारी तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांनी ममता बॅनर्जी यांच्या गटातून ऋतब्रता यांच्या गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे भ्रष्टाचाराशी संबंधित एका प्रकरणात केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने पत्नी आणि दोन मुलांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मित्रा बंडखोर गटात प्रवेश केला आहे.

आमदार मदन मित्रांनी सोडली ममतांची साथ

तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर देखील मदन मित्रा यांनी ममता बॅनर्जी यांच्याबरोबर राहण्याचा निर्धार केला होता. पण, अचानक त्यांनी बंडखोर गटात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मित्रा ममतांच्या सरकारमध्ये मंत्रिपदावर कार्यरत होते. इतरांप्रमाणे मित्रा यांनी देखील ममतांचे भाचे आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यावर टीका केली. “अभिषेक बॅनर्जी यांनी सहा महिन्यांसाठी दूर राहावे,” अशी मागणी त्यांनी केली होती. ही मागणी मान्य झाल्याने ममतांची साथ सोडल्याचा दावा मित्रांनी माध्यमांशी बोलताना केला.

ऋतब्रता बॅनर्जी यांचा गट

मदन मित्रांनी माध्यमांशी बोलताना आता विधिमंडळातील केवळ बैठक व्यवस्था बदलली असल्याचे वक्तव्य केले. दुसरी मित्रा यांच्या आरोपांना उत्तर देताना अभिषेक बॅनर्जी आता निमित्त झाले असल्याचे मत ममतांनी नोंदवले. मित्रा यांनी ईडीच्या भीतीमुळे पक्ष सोडल्याचा आरोप ममतांनी केला. निवडणुकीतील पराभवानंतर ऋतब्रता बॅनर्जी यांनी वेगळा गट स्थापन केला असून, सध्या त्यांच्याबरोबर ८० आमदार आहेत. तसेच, विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद देखील त्यांच्याकडे आहे. मदन मित्रांनी ऋतब्रता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत माध्यमांशी संवाद साधला.

मित्रा काय म्हणाले?

“मी अभिषेक बॅनर्जी यांना म्हणालो आम्ही पक्ष उभा करतो, त्यानंतर तुम्ही माघारी या आणि पद सांभाळा पण त्यांनी नकार दिला. पक्ष बुडतोय, बोट बुडायला लागली आहे. लोक मरतायेत. पण, पक्षाने सर्वांना मरणाच्या दारात सोडले आहे. पण, केवळ अभिषेक वाचले पाहिजेत”, असे मदत मित्रा पक्षावर टीका करताना म्हणाले. पक्ष सर्वांचा असला तरी तिथं अभिषेक यांनाच महत्व दिलं जात असल्याची खंत मित्रा यांनी बोलून दाखवली.

ईडीचे समन्स आणि प्रवेश

दरम्यान, बंडखोरांनी स्वार्थासाठी भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांच्या भीतीपोटी पक्ष सोडल्याचा आरोप ममतांच्या समर्थकांनी केला आहे. मदत मित्रा यांच्या पत्नी आणि दोन मुलांना देखील भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले होते. पालिकेच्या नोकरी भरतीत भ्रष्टाचाराशी निगडीत हे प्रकरण असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. दरम्यान, मित्रा यांना देखील सीबीआयने शारदा चिट फंड प्रकरणात २०१४ आणि २०२१ साली अटक केली होती.