पश्चिम बंगालमधल्या शास्त्रज्ञांच्या एका गटाने म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसच्या निदानासाठीचं टेस्टिंग किट तयार केलं आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांना हा बुरशीजन्य आजार होत असल्याचं समोर आलं आहे. या आजाराचं निदान करणारं हे पहिलं भारतीय किट ठरणार आहे.

DIAGSure म्युकरमायकोसिस डिटेक्शन किट हे पश्चिम बंगालमधल्या बक्राहट भागातल्या शास्त्रज्ञांनी तयार केलं आहे. ब्लॅक फंगसच्या निदानासाठी आत्ता जे किट्स उपलब्ध आहेत, त्यांची किंमत साधारणपणे ७ ते ८ हजारांच्या आसपास आहे. कारण ते विदेशातून आयात केलेले आहेत. मात्र हे नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे बनवलेलं किट विदेशी किट्सच्या तुलनेत स्वस्त असेल अशी माहिती हे किट बनवलेल्या प्रयोगशाळेचे प्रमुख राजा मजुमदार यांनी इंडिया टुडेला दिली.

ते म्हणाले, उच्च दर्जाचे टेस्टिंग किट रास्त दरात पुरवणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस आजाराची RTPCR चाचणी वेगात होऊ शकेल. अशा प्रकारचं किट तयार करणारी आमची पहिली आणि एकमेव भारतीय संस्था आहे. इतर सर्व ठिकाणी विदेशी किट्सचा वापर केला जातो.

या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही या किटला परवानगी दिली आहे.