बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने मॅगीची जाहिरात केली असून त्यात हानिकारक रसायने सापडल्याने तिला नोटीस देण्यात आली आहे. जाहिरातीत केलेल्या दाव्यांबाबत ही नोटिस आहे. माधुरी दीक्षित हिने टू मिनिट्स नूडलची जाहिरात केली असून त्यात या नूडलची पोषणमूल्ये जास्त असल्याचा दावा केला आहे, त्यामुळे तिने पंधरा दिवसांत त्यावर स्पष्टीकरण करावे, असे हरिद्वारच्या अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे.
मॅगीच्या उत्तर प्रदेशातून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यात मोनो सोडियम ग्लुटामेट (अजिनोमोटो) हे मान्यताप्राप्त प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात आढळून आले होते. नेस्ले इंडियाला मॅगीची संबंधित पाकिटे उत्तर प्रदेशातून काढून घेण्याचा आदेश देण्यात आला होता. अजिनोमोटो हा मिठाचा प्रकार असतो व त्यामुळे मॅगीला खूप चांगली चव येते व त्यामुळे मुलांना मॅगी खाण्याची सवय जडते. प्रत्यक्षात अजिनोमोटोचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे रक्तदाब वाढतो. अजिनोमोटो हे जपानी कंपनीचे नाव असून या पदार्थामुळे चिनी अन्नपदार्थ जास्त लोकप्रिय होऊ शकले. माधुरी दीक्षित हिने मॅगी आरोग्याला फार चांगले असल्याचा दावा जाहिरातीत केला आहे. जर माधुरीला या नोटिशीस वेळेत उत्तर देता आले नाही तर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असे अन्न सुरक्षा अधिकारी महिमानंद जोशी यांनी म्हटले आहे.