आपल्या दर्जेदार आणि सहजसुंदर लेखनशैलीतून लहान मुलांना वाचनाची गोडी लावणारे साहित्य निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका माधुरी पुरंदरे यांना बालसाहित्यातील योगदानाबद्दल साहित्य अकादमीचा यंदाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर ‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’ या पुस्तकासाठी अवधूत डोंगरे यांची युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
बालसाहित्य आणि युवा वर्गातील पुरस्कारांची घोषणा साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ तिवारी यांनी केली. माधुरी पुरंदरे यांना मराठीतील बालसाहित्यातील योगदानाबद्दल गौरवण्यात आले आहे. त्यांच्यासह सूर्य अशोक (कोकणी), राजकुमार भुवोंसना (मणिपुरी), मुन्नी सपकोटा (नेपाळी), कुलवीर सिंह सुरी (पंजाबी), नीरज दडय़ा(राजस्थानी), इरा नटराजन (तामिळ), दसरी व्यंकटरमण ( तेलगु), दिनेश चंद्र गोस्वामी( आसामी), गौरी धर्मपाल (बाड्ला), सुभद्रा सेन गुप्ता (इंग्रजी), ईश्वर परमार (गुजराती), आनंद बी. पाटील (कन्नड), के.वी.रामनाथन (मल्याळम), माधुरी पुरंदरे (मराठी), दास बेनहूर (जितेंद्र नारायण दास) (ओडिया), वासदेव सिंधुभारती, ध्यानसिंह (डोंगरी)दिनेश चमोला  शैलेश (हिंदी) यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
येत्या १४ नोव्हेंबर रोजी बंगळूरू येथे होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. पन्नास हजार रुपये व ताम्रफलक  असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  
युवा पुरस्कारात मणिकादेवी (आसामी), कौशिक बरूआ (इंग्रजी), अनिल चावडा (गुजराती), नरेशचंद्र नायक (कोकणी), इन्दु मेनन (मल्याळम), अवधूत डोंगरे (मराठी), पराम्बा योग माया (संस्कृत) आर.अभिलाष (तामिळ) इल्तेफात अमजदी (उर्दू) गगनदीप शर्मा (पंजाबी) नरेंद्रकुमार भोई (ओडिया), कुमार अनुपम (हिंदी), काव्य कदमे (कन्नड) यांचा समावेश आहे.
“नव्या पिढीतील लेखकांनी बालसाहित्याकडे वळले पाहिजे. आता मुलांच्या पिढय़ा लवकर बदलत आहेत. मुलांची भाषा त्यांना चांगली माहीत असेल. मुलांना आवडतील आणि समजतील असे लेखनाचे आकृतिबंध निवडून विचारपूर्वक आणि आग्रहाने बालसाहित्याची निर्मिती झाली तर चित्र बदलेल.”
– माधुरी पुरंदरे