मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यातील २५ वर्षांच्या तरुणीने दोन दिवसांवर येऊन ठेपलेले लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मुलीचे ज्या तरुणाशी लग्न ठरले होते. त्या तरुणाचे गुप्तांग हल्लेखोरांनी कापले होते. या प्रकारानंतर तरुणीने हे लग्नच मोडण्याचा निर्णय घेतला.

मोरेना जिल्ह्यात राहणारा २५ वर्षांचा तरुण गेल्या आठवड्यात गुरुवारी संध्याकाळी लघूशंकेसाठी घरातून बाहेर पडला. याच दरम्यान त्याला दोन हल्लेखोरांनी गाठले. त्याला बेदम मारहाण करत निर्जनस्थळी नेण्यात आले. यानंतर हल्लेखोरांनी त्याचे गुप्तांगही कापले आणि तिथून पळ काढला. त्या तरुणावर शस्त्रक्रिया देखील करणे अशक्य असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. या हल्ल्यामागील कारण अजूनही अस्पष्ट असून पोलीस हल्लेखोरांचा शोध आहेत. पीडित तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्याने मानसिक धक्का बसलेल्या तरुणाचे आता लग्न मोडले आहे.

तरुणाचे सहा फेब्रुवारी रोजी लग्न होणार होते. ज्या तरुणीशी त्याचा साखरपुडा झाला होता तिने आता लग्नास नकार दिला आहे. या घटनेनंतर लग्न मोडणार याची आम्हाला कल्पना होतीच, अशी प्रतिक्रिया मुलाच्या काकाने माध्यमांना दिली.