मध्य प्रदेशातील नर्मदापूरम येथील एका सत्र न्यायालयाने सात गोरक्षकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २०२२ मध्ये गायीची तस्करी होत असल्याच्या संशयावरून काही जणांना मारहाण झाली होती. त्यात नजीर अहमद यांचा मारहाणीत मृत्यू झाला होता. नर्मदापूरम जिल्ह्यातील बाबा केवट, अज्जू राठोड, प्रकाश कौशल, पवन बाथम, अमर उर्फ भोला बाथम, कन्हैया बाथम आणि अनुज रघुवंशी या सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १४८, कलम ३०७/१४९ आणि ३०२/१४९ अन्वये गु्न्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय घडले होते?

२ व ३ ऑगस्ट २०२२ च्या रात्री शेख लाला, नजीर अहमद, शेख मुस्ताक हे काही गुरेढोरे घेऊन नंदरवाडा येथून महाराष्ट्रात जात होते. त्यावेळी बाराखाद गावाजवळ गोरक्षकांनी त्यांचे वाहन अडवले. गावकऱ्यांनी ट्रक अडवल्यानंतर तिघांना काठ्या व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नजीर अहमद यांचा मृ्त्यू झाला.

या प्रकरणी दंगलीचा (कलम १४७) गुन्हा सिवानीमालवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. तसेच खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अज्ञातांवर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी नजीर अहमद व साक्षीदारांचा जबाब नोंदवला होता. तसेच घटनास्थळावरून रक्ताचे नमुने गोळा केले होते.

न्यायालयात काय घडले?

न्यायालयाने सर्व पुराव्यांची तपासणी केल्यानंतर आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव गोळा केल्याचे सिद्ध झाले. तसेच जमावाच्या हातात लाठ्या-काठ्या देण्यात आल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार झुंड बळीचा आहे. बेदम मारहाण झाल्याने मृताच्या शरीरावर गंभीर जखमा आहेत. न्यायालयाने या प्रकरणी वैद्यकीय अहवालाचा आधार घेतला. मृताच्या डोक्यावर तसेच इतर ठिकाणी जखमा झाल्याचे न्यायालयाला वैद्यकीय अहवालात आढळले. शवविच्छेदन अहवालात देखील मृत नजीर अहमद यांच्या कवटीवर मारहाण झाल्याचे आढळून आले.

हल्ल्यामुळे मृत्यू झालेला नाही, असा दावा आरोपींनी केला होता. तो न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, मारहाणीसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांवर रक्त कसे आले? हे न्यायालयाला पटवून देण्यात आरोपी अपयशी ठरले. त्यामुळे आरोपींनी नजीर अहमद यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले, असे न्यायालयाने नोंदवले आहे.