Madhya Pradesh Elections 2023: मध्य प्रदेशात वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे. राज्यात सत्तारूढ भाजपाविरोधात काँग्रेस असा चुरशीचा सामना होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष निवडणुकीत जिंकण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावताना दिसून येत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी सिहोर जिल्ह्यातील बुधनी विधानसभा मतदारसंघातील लाडकुई येथे एका सभेला संबोधित केले.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, त्यांनी राज्यातील राजकारणाची व्याख्या बदलून टाकली. यावेळी त्यांनी महिलांना भावनिक आवाहन केले. राज्यातील महिला माझ्या बहिणी असून जेव्हा मी नसेन, तेव्हा त्या माझी नक्कीच आठवण काढतील. ”मी मध्य प्रदेशातील राजकारणाची व्याख्या बदलली आहे. तुम्ही अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता अनुभवली आहे. तुम्ही कधी त्यांना जनतेची काळजी घेताना पाहिले आहे का? ” असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले. तसेच सभेत पुढे बोलताना ते म्हणाले, ”माझ्या बहिणींनो, तुम्हाला माझ्यासारखा भाऊ मिळणार नाही. मी आसपास नसताना तुम्हाला माझी आठवण येईल.”
या सभेसह आधी झालेल्या सभांमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान लोकांना संबोधित करताना अनेकदा भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महिलांसाठी ‘लाडली बहना योजना’ सुरु केली आहे. या योजनेमध्ये आधी १ हजार रुपये इतकी आर्थिक मदत करण्यात येत होती. ऑगस्ट महिन्यापासून शिवराजसिंह चौहान यांनी ही रक्कम वाढवून १,२५० रुपये इतकी केली आहे. तसेच महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या विरोधात सरकार विरोधी (अँटी इन्कम्बन्सी) भावना असूनही ते पाचव्यांदा सत्तेत येण्यासाठी महिलांच्या योजनांवर लक्ष केंद्रीत करत आहेत. मुख्यमंत्री चौहान मध्य प्रदेशमध्ये ‘मामा’ या नावाने लोकप्रिय आहेत.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर पत्रकारांनी सोमवारी बुधनी येथे राज्यातील काँग्रेसचे प्रमुख कमलनाथ याना प्रश्न विचारला. ”खोटेपणासाठी आणि घोषणांसाठी (मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान) यांची आठवण काढली जाईल.” असे कमलनाथ म्हणाले. सध्याची परिस्थिती आणि मुख्यमंत्र्यांचे विधान पाहता त्यांचे सत्तेतून जाणे निश्चित असल्याचे माजी काँग्रेस अध्यक्ष अरुण यादव म्हणाले.
मागील आठवड्यात खरगोन येथे झालेल्या एका सभेत संबोधित करताना मला कोणत्याही पदाची लालसा नसल्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले होते. ”माझे शरीर तुमच्या आणि तुमच्या मुलांसाठी उपयोगी पडले तर माझे आयुष्य यशस्वी होईल” असेही ते यावेळी म्हणाले होते.
हेही वाचा : महिला मतदानाच्या टक्केवारीत वाढ; शिवराज सिंह चौहान यांना महिलांचा पाठिंबा का मिळतो?
दरम्यान या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. या दरम्यान ५ ऑक्टोबर रोजी राज्यतील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. म्हणजेच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. २०१८ च्या निवडणुकीत राज्यात त्रिशंकु स्थिती निर्माण झाली होती. यामध्ये भाजपाला १०९ व काँग्रेसने ११४ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसने कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन केले होते. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर केवळ १५ महिन्यांमध्ये म्हणजे २०२० मध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली असणारे सरकार कोसळले होते. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे निष्ठावंत असणारे अनेक काँग्रेस आमदार भाजपामध्ये सामील झाले. त्यानंतर पुन्हा एकदा मध्यप्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात नवीन सरकार स्थापन झाले.