रक्षाबंधनाच्या दिवशी बांगड्या विकणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातील इंदोरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या गोविंद नगरमध्ये ही घटना घडली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये प्रादेशिक स्थानिक लोक बांगड्या विकणाऱ्या व्यक्तीला जबर मारहाण करताना दिसत आहे. त्याचबरोबर त्याच्या बॅगमधून एकापाठोपाठ अनेक बांगड्याही काढल्या. स्थानिक लोकांकडून या बांगडी विक्रेत्या व्यक्तीला मारहाण केल्याच्या बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मारहाणीच्या या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

बांगड्या विकण्याच्या बहाण्याने महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप करत मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये लोकांच्या जमावाने एका तरुणाला मारहाण केली आणि शिवीगाळ केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांना बांगडी विक्रेत्याला मारहाण करत त्याचा माल जमिनीवर फेकताना आणि त्याला शिवीगाळ करताना दिसत आहे. काही हल्लेखोरांनी पीडितेचे पैसेही हिसकावले.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढी यांनी कथित घटनेवरुन शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्ला चढवला आणि हल्लेखोरांना दहशतवादी म्हटले.

“हा व्हिडिओ अफगाणिस्तानचा नाही तर शिवराजजींच्या मध्य प्रदेशातील इंदोरचा आहे. जिथे बांगड्या विकणाऱ्या एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण करण्यात आली आणि त्याचा माल लुटण्यात आला. नरेंद्र मोदी जी, हा भारत तुम्हाला बनवायचा होता का? या दहशतवाद्यांवर कारवाई कधी होणार?”असे इम्रान प्रतापगढी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून बाणगंगा पोलीस स्टेशनच्या राजेंद्र सोनी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. ते म्हणाले की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओबाबत अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून १४ कलम लावण्यात आले आहेत. व्हिडिओतील आरोपींची ओळख पटवून राकेश पवार, राजकुमार भटनागर आणि विवेक व्यास यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अन्य आरोपींची ओळख पटवून अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.