भोपाळ : ‘एकपात्री विनोदकार वीर दास यांच्यासारख्या लोकांना मी विदूषक म्हणतो. अशांना राज्यात कार्यक्रम करू देणार नाही. दास यांनी माफी मागितली तर आम्ही त्यावर विचार करू’, असे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गुरुवारी जाहीर केले. ‘टू इंडियाज’ या कार्यक्रमामुळे दास यांच्याविरोधात मुंबई आणि दिल्ली येथील पोलीस ठाण्यांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

वीर दास, सध्या अमेरिकेत असून त्यांनी सोमवारी यूटय़ूबवर ‘आय कम फ्राम टू इंडिया’ नावाची चित्रफीत प्रसारित केली होती. ही चित्रफीत वॉशिंग्टन डीसी येथील जॉन एफ केनेडी सेंटरमध्ये दास यांच्या अलीकडील कार्यक्रमाचा एक भाग होती.

मुंबईस्थित एकपात्री विनोदकार वीर दास यांनी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत. सहा मिनिटांच्या चित्रफितीमध्ये दास यांनी देशाच्या कथित दुहेरी वर्तनाबद्दल भाष्य केले आहे. याशिवाय, करोना महासाथ, बलात्काराच्या घटना आणि विनोदी कलाकारांवर केली जाणारी कारवाई यांसह, शेतकरी निदर्शने या मुद्दय़ांचा उल्लेख केला आहे.

‘वीर दास यांच्यासारख्या लोकांना मी विदूषक म्हणतो. अशांना राज्यात कार्यक्रम करू देणार नाही. दास यांनी माफी मागितली तर आम्ही त्यावर विचार करू’, असे मिश्रा यांनी सांगितले.  काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार महुआ मोईत्रा, काँग्रेस नेते शशी थरुर यांनी वीर दास यांचे समर्थन केले आहे. त्यांच्या भूमिकेवर मिश्रा यांनी टीका केली आहे. भारताला बदनाम करण्याच्या प्रयत्न दास यांच्यासारख्या विदूषकांकडून केला जातो आणि त्याचे समर्थन कपिल सिब्बल आणि इतर काँग्रेसचे नेते करतात, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनीही दास यांच्यावर टीका केली होती. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूआयसीई) ही एक चित्रपट व्यवसायाशी निगडित एक संस्था असून तिचे अडीच लाखांहून अधिक नोंदणीकृत सदस्य आहेत. दास यांनी जाहीर माफी मागितल्याशिवाय या संस्थेचे सदस्य त्यांच्याबरोबर काम करणार नाहीत, असा दावा या संस्थेने केला आहे.