scorecardresearch

Video : “थोडीशी लाच घेतली तर…”, महिला आमदाराचं अजब तर्कट! व्हिडीओ व्हायरल!

“पीठामध्ये मीठाएवढा भ्रष्टाचार चालतो”, असं म्हणत अधिकाऱ्यांना भलत्याच शब्दांत ‘समज’ देणाऱ्या रामबाई सिंग नेहमी आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात.

bsp mla rambai singh viral video
आमदार रामबाई सिंग (व्हायरल व्हिडीओमधील स्क्रीनशॉट)

भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे, भ्रष्टाचारामुळे देशाचा विकास खुंटलाय, लाचखोरीमुळे जनतेवर अन्याय होतो अशी अनेक वाक्य किंवा संवाद आपण ऐकतो. सर्वच राजकीय मंडळी भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन व्हायला हवं, याचा देखील पुरस्कार करतात. पण एक महिला आमदार मात्र याचं उघडपणे समर्थन करताना दिसत आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, अधिकारी लाच मागत असल्याचीच तक्रार घेऊन काही सामान्य नागरिक या महिला आमदारांकडे गेले होते. पण यासाठी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करताना त्यांनी भ्रष्टाचाराची ‘अनोखी’ शिकवण दिली!

हा सगळा प्रकार घडलाय मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशच्या दामोहमधील पथरिया भागातल्या बहुजन समाजवादी पक्षाच्या महिला आमदार रामबाई सिंह नेहमीच आपल्या अजब विधानांनी चर्चेत असतात. त्यांनी अलिकडेच भ्रष्टाचारांसंदर्भात केलेल्या विधानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये रामबाई सिंह यांनी केलेली वक्तव्य नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरली आहेत.

गावकरी लाचखोरीचीच तक्रार घेऊन आले होते!

दामोहच्या सतउआ गावात पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, या योजनेच्या नावाने अधिकारी लाच मागत असल्याची तक्रार घेऊन ग्रामस्थ रामबाई सिंह यांच्याकडे गेले होते. या तक्रारीनंतर रामबाई सिंह यांनी संबंधित अधिकारी आणि ग्रामस्थांना एकत्र बोलावलं आणि आपली ‘शिकवणी’ सुरू केली!

“पीठात मिठाप्रमाणे भ्रष्टाचार चालतो!”

अधिकाऱ्यांनी ९ हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पण त्यावरून अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारण्याऐवजी रामबाई सिंह यांनी उलट भ्रष्टाचाराचं बोधामृत पाजलं. थोडीशी लाच घेतली, तर चालतं, पण कुणी त्याहून जास्त लाच मागू नये, असं त्यांनी या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सांगितलं. “हे बघा, पीठामध्ये मीठाप्रमाणे (भ्रष्टाचार) चालतो. पण असं नाही की कुणाकडून आख्खं ताटच हिसकून घ्या. मी नाही म्हणत नाहीये. आम्हालाही माहितीये की अंधेर नगरी चौपट राजा असा प्रकार सुरू आहे. पण एवढा भ्रष्टाचार चांगला नाही”, अशा शब्दांत रामबाई सिंह यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘समज’ दिली.

रामबाई सिंह यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-09-2021 at 18:26 IST

संबंधित बातम्या