Burhanpur Teen Majid Husain got 3rd Rank in JEE Advanced 2025 : मध्य प्रदेशमधील बुरहाणपूर जिल्ह्यातील १७ वर्षीय माजिद मुजाहिद हुसैन याने मोठी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने जेईई अॅडव्हान्स्ड २०२५ परीक्षेत ३६० पैकी ३३० गुण मिळवत देशात तिसरा क्रमांक (ऑल इंडिया रँक ३) प्राप्त केला आहे. त्याच्या या यशामुळे त्याच्या गावात जल्लोषाचं वातावरण आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यापासून ते त्याचे शिक्षक, नातेवाईक व मित्रपरिवारापर्यंत सर्वांनीच माजिदवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
माजिदने सांगितलं की त्याने १० वीची (एसएससी) परीक्षा दिल्यापासून जेईईची तयारी करण्यास सुरुवात केली होती. दोन वर्षे त्याने दररोज १२ तास अभ्यास केला. या काळात लक्ष विचलित करतील अशा प्रत्येक गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवलं. माजिद म्हणाला “मी कधीच समाजमाध्यमांचा वापर केला नाही. माझ्याकडे आयपॅड आहे. मी दिवसभर आयपॅड वापरायचो. परंतु, कधीच त्यावर समाजमाध्यमांचा वापर केला नाही, टाईमपास केला नाही. केवळ अभ्यास करण्यासाठीच मी आयपॅड वापरायचो. तसेच, आठवड्यातून केवळ एक तास फोन वापरायचो. नातेवाईकांशी बोलण्यासाठी फोनचा वापर करायचो. त्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टीसाठी फोनचा वापर करत नव्हतो”.
शिक्षकांचं सहकार्य व स्वयंशिस्तीच्या जोरावर हे यश मिळालं : माजिद
माजिदने बुरहाणपूरमधील एका स्थानिक शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने रेसिजेन्शियल स्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याने जवळच्याच एका खासगी कोचिंग इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेतला. माजिद म्हणाला, “कोचिंग इन्स्टिट्युट, शिक्षकांचं सहकार्य आणि स्वयंशिस्त ही माझी सर्वात मोठी ताकद होती. या जोरावरच मी हे यश मिळवू शकलो”.
माजिदचे वडील मुजाहिद हुसैन हे विद्यापीठात प्राधापक आहेत, तर त्याची आई सकीना हुसैन या गृहिणी आहेत. सकीना हुसैन म्हणाल्या, “आम्ही माजिदवर कधीच अभ्यासाचं ओझं टाकलं नाही. अभ्यास करण्यासाठी त्याच्या मागे लागलो नाही. मात्र, त्याच्या जिज्ञासेला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. त्यामुळेच तो अधिक अभ्यास करत होता”. दरम्यान, माजिदच्या या यशानंतर त्याच्या पालकांनी त्याला नवी मोटारसायकल व मोबाइल फोन गिफ्ट केला आहे.
माजिदची इच्छा आहे की “बुरहाणपूर देखील कोटाप्रमाणे (राजस्थानमधील शहर, जिथे देशभरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जातात) स्पर्धा परिक्षांचं हब बनावं. देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या सुविधा मिळतात, तशाच सुविधा व मार्गदर्शन बुरहाणपूरमधील विद्यार्थ्यांना मिळायला हवं”. माजिदला आता आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे.