जय मजुमदार, द इंडियन एक्स्प्रेस
उज्जैन, नवी दिल्ली: प्राचीन उज्जैन नगरीला महानगर बनवण्यासाठी मध्य प्रदेश सरकार नवनवीन पायाभूत प्रकल्पांची माळ लावत असताना याच परिसरात मुख्यमंत्री मोहन यादव यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांनी जमीनखरेदीचा सपाटा लावल्याचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या विशेष वृत्त तपासातून उघड झाले आहे. उज्जैन शहराच्या नियोजन आराखड्यात ‘कृषी’ऐवजी ‘निवासी’ म्हणून भूखंडबदल प्रस्तावित असलेल्या प्रत्येक क्षेत्रात मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची जमीन आहे, हे आणखी विशेष!

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची मोहन यादव यांनी १३ डिसेंबर २०२३ रोजी शपथ घेतली. तेव्हापासून २०२५पर्यंत यादव यांचे कुटुंबीय आणि त्यांच्याशी संबंधित बांधकाम कंपन्यांनी उज्जैनमध्ये १६८ एकर क्षेत्रफळाचे १३७ भूखंड ४५ कोटींना खरेदी केल्याचे जमीन व्यवहार नोंदींतून स्पष्ट झाले आहे. यात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सीमा, सून शालिनी, भाऊ नंदलाल आणि नारायण, वहिनी रेखा आणि पुतण्या अभय यांच्यासह अन्य काही नातलगांच्या नावांचा समावेश आहे.

सन २०२३ ते २०२५ या काळात मध्य प्रदेश सरकारने उज्जैन शहराच्या पायाभूत विकासासाठी विविध रस्ते, जोड रस्ते, महामार्ग यांसह अन्य प्रकल्पांची आखणी केली असतानाच या प्रकल्पांच्या लगत यादव कुटुंबीयांनी खरेदीचे व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले. उज्जैन शहराच्या २०३५ सालच्या विकास आराखड्यानुसार कृषी जमीनीवर निवासी वा वाणिज्य वापराचा आरक्षण बदल प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्रांतही मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्यात आल्याचे ‘एक्स्प्रेस’कडील दस्तावेजात दिसते.

उज्जैन शहराचा विकास आराखडा २०२३मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.  त्यावेळी मोहन यादव हे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले नव्हते. मात्र, उज्जैन विकास प्राधिकरण, मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळ अशा सरकारी संस्थांमध्ये ते पदाधिकारी आणि दहा वर्षांपासून उज्जैनचे आमदारही राहिले आहेत.

या जमीन व्यवहारांमुळे यादव अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात वारंवार संपर्क साधूनही मुख्यमंत्री वा त्यांच्या कार्यालयाकडून प्रतिसाद मिळाला नाही. तर,‘यादव यांचे कुटुंब कित्येक वर्षांपासून बांधकाम व्यवसायात असल्याने या व्यवहारांचा त्यांच्या मुख्यमंत्री पदाशी संबंध जोडणे योग्य ठरणार नाही,’ अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ सरकारी अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

मोक्याच्या भूखंडांवर ताव

‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या तपासानुसार यादव कुटुंबीयांची भूखंड खरेदी आणि मध्य प्रदेश सरकारने आखलेले पायाभूत प्रकल्प यांचा संबंधही दिसून येतो. यादव कुटुंबाच्या १६८ एकरपैकी १११ एकर जमीन उज्जैनमधील नवीन रस्ते प्रकल्पांना लागून अशी आहे. त्यातील उज्जैन-बाडनगर आणि उज्जैन-इंदूर महामार्गालगतचे ५१ एकरचे ३८ भूखंड एप्रिल २०२४नंतर खरेदी करण्यात आल्याचे दिसून येते.

जमीन खरेदीचा सपाटा

* यादव मुख्यमंत्री होण्यापूर्वीदेखील त्यांचे पुत्र वैभव आणि कन्या कलावती यांच्या मालकीचे १७९ एकरचे १०८ भूखंड उज्जैन पट्ट्यात होते. यादव हे शिक्षणमंत्री असताना २०२१ ते २३ दरम्यान त्यात ८५ एकरची भर पडली.

* यादव मुख्यमंत्री झाल्यानंतर जानेवारी २०२४ पासून डिसेंबर २०२५पर्यंत यादव यांच्या कुटुंबीयांनी १६८ एकरची भूखंड खरेदी केली. यात कुटुंबाअंतर्गत झालेल्या १२ एकरच्या जमीन व्यवहारांचाही समावेश आहे. * उज्जैन शहरात मुख्यमंत्र्यांच्या मालकीची १७ एकर जमीन असून त्यापैकी १३ एकर त्यांनी १९९८मध्ये खरेदी केली होती. तसेच त्यांच्या पत्नीच्या नावेही १०.६ एकर जमीन या शहरात आहे.