Husband Tortures Wife in Rajgarh Crime News: मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी आणि अंगावर काटा आणणारी क्रूर घटना समोर आली आहे. एका नराधम पतीने आपल्या पत्नीला घरात ओलीस ठेवून तिच्यावर अमानुष अत्याचार केले. तिला घरातल्या खांबाला साखळदंडाने कुलूप लावून बांधून ठेवले, गरम लोखंडी गजाने तिच्या शरीरावर चटके दिले. मात्र, या नरकयातनेतून अत्यंत धाडसाने सुटका करून घेत, गळ्यात तोच साखळदंड अडकलेल्या अवस्थेत या महिलेने तब्बल ६ किलोमीटरची पायपीट केली आणि थेट पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. मांगीबाई तन्वर असे या पीडित महिलेचे नाव असून, आरोपी पतीचे नाव सरदार सिंग तन्वर आहे.
“आता बघतोच तू पोलिसात कशी जातेस?”…खांबाला बांधून ठेवलं
मिळालेल्या माहितीनुसार, १० जूनच्या रात्री मांगीबाईंचा पती सरदार सिंग दारू पिऊन घरी आला आणि त्याने घरगुती वादातून पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मांगीबाईंनी याला विरोध केला असता, नराधम पतीने घराबाहेर जाऊन झाडाची जाड फांदी तोडून आणली आणि मांगीबाईंना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
पतीच्या या अमानुष मारहाणीला कंटाळून मांगीबाईंनी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या रात्रीच्या अंधारातच घराबाहेर पडल्या. त्या खिलचीपूर पोलीस ठाण्याच्या दिशेने चालत निघाल्या होत्या. मात्र, वाटेतच एका मंदिरापाशी पतीने त्यांना गाठले, तिथे पुन्हा बेदम मारहाण केली आणि बळजबरीने ओढत घरी आणले.
घरी आणल्यानंतर पतीने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. त्याने मांगीबाईंच्या गळ्यात जाड लोखंडी साखळदंड गुंडाळून त्याला कुलूप लावले आणि साखळीचे दुसरे टोक घरातल्या एका खांबाला बांधून ठेवले. “आता बघतोच तू पोलिसात कशी जातेस आणि माझ्याविरुद्ध तक्रार कशी करतेस,” असं म्हणत त्याने तिला आव्हान दिलं.
गॅसवर गज तापवून दिले चटके; मदतीसाठी कोणीही आलं नाही
साखळदंडाने बांधून ठेवल्यानंतरही पतीचा राग शांत झाला नव्हता. त्याने स्वयंपाकघरातील गॅस शेगडीवर लोखंडी गज लालभडक होईपर्यंत तापवला आणि मांगीबाईंच्या कमरेवर, पाठीवर आणि मांडीवर त्याचे चटके दिले. मांगीबाई वेदनेने विव्हळत होत्या, ओरडत होत्या, पण त्यांच्या मदतीला कोणीही धावून आले नाही.
पुढील २४ तास मांगीबाई त्या नरकयातनेत घरातच कैद होत्या. यादरम्यान, पती गावात पंचायत बोलावून मांगीबाईंवर पोलिसात न जाण्यासाठी दबाव आणण्याची तयारी करत होता. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मांगीबाईंनी वरवर पतीचे ऐकण्याचे नाटक केले, पण मनातल्या मनात त्या सुटकेची संधी शोधत होत्या.
अन् एका दगडाने मिळवून दिलं स्वातंत्र्य!
शेवटी ती सुटकेची संधी अखेर चालून आली. पती सरदार सिंग गावकऱ्यांना पंचायतीसाठी गोळा करायला घराबाहेर पडला. घर रिकामे असल्याचे पाहून मांगीबाईंची नजर कोपऱ्यात पडलेल्या एका दगडावर गेली. त्यांनी तो दगड उचलला आणि गळ्यातल्या कुलूपावर प्रहार करण्यास सुरुवात केली.
अनेक प्रहारांनंतर अखेर ते कुलूप तुटले नाही, पण साखळीची एक कडी सैल झाली आणि घरातून त्यांची सुटका झाली. गळ्यातून साखळी पूर्णपणे काढणे शक्य नव्हते, त्यामुळे गळ्यात साखळदंड आणि लटकणारे कुलूप तशाच अवस्थेत ठेवून त्यांनी थेट पोलीस ठाण्याच्या दिशेने धाव घेतली.
रात्रीच्या किर्रर्र अंधारात, काट्याकुट्यांतून ६ किलोमीटरचा खडतर प्रवास
रात्रीचा किर्रर्र अंधार, निर्जन रस्ता आणि शेतातल्या पायवाटांवरून मांगीबाई जीवाच्या आकांताने धावत होत्या. पायात चप्पल नव्हती, काट्याकुट्यांमुळे पाय रक्तबंबाळ झाले होते. वाटेत जे लोक भेटले, त्यांना गळ्यात साखळी असलेली महिला पाहून ती मानसिकदृष्ट्या आजारी असावी असे वाटले. त्यामुळे भीतीपोटी कोणीही मदत केली नाही. मात्र, एका संवेदनशील वाटसरूने तिची भयानक अवस्था पाहून तिला खाण्यासाठी काहीतरी दिले. त्या बळावर मांगीबाईंनी कसेबसे पोलीस ठाणे गाठले.
पोलीसही चक्रावले… जो साखळदंड मौन राखण्यासाठी होता, तोच ठरला मुख्य पुरावा
रात्री १० च्या सुमारास जेव्हा मांगीबाईंनी खिलचीपूर पोलीस ठाण्यात प्रवेश केला, तेव्हा तिथले अनुभवी पोलीस अधिकारीही हादरले. एका महिलेच्या गळ्यात लोखंडी साखळदंड आणि कुलूप लटकत होते, शरीरावर चटक्यांचे ताजे आणि गंभीर व्रण होते आणि ती भीतीने थरथर कापत होती. पोलिसांना पाहताच तिला रडू कोसळले.
पोलिसांनी तात्काळ संवेदनशीलतेने तिच्या गळ्यातील साखळी काढली आणि तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. वैद्यकीय अहवालात तिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराची पुष्टी झाली आहे.
“पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरुद्ध छळ, गंभीर मारहाण आणि बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे,” अशी माहिती खिलचीपूरचे ठाणे प्रभारी कमलसिंग गेहलोत यांनी दिली.
पतीने ज्या साखळदंडाचा वापर मांगीबाईंचा आवाज दाबण्यासाठी आणि त्यांना कैदेत ठेवण्यासाठी केला होता, अखेर मांगीबाईंनी त्याच साखळदंडाला आपल्यावरील अत्याचाराचा सर्वात मोठा जिवंत पुरावा बनवून पतीला तुरुंगाची हवा खायला लावली. त्यांच्या या अद्भूत धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
