Madhya Pradesh Dead Woman Returned Home : मध्य प्रदेशमध्ये एक वेगळं प्रकरण समोर आलं आहे. दीड वर्षापूर्वी मृत समजलेली एक महिला अचानक पुन्हा तिच्या घरी परतली आहे. यामुळे तिच्या कुटुंबीयांसह, शेजाऱ्यांना आणि विशेषत: पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. कारण तिची हत्या झाली असं समजून कुटुंबीयांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. तसेच तिच्या कथित हत्येच्या प्रकरणात चार आरोपी झाबुआ जिल्ह्यातील तुरुंगात आहेत. ललिता असं या महिलेचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
मध्य प्रदेशातील मंदसौरच्या नवाली गावात ही महिला राहात होती. मात्र, ती अचानक गायब झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना वाटलं की तिची हत्या झाली. याच काळात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. ललिताचे वडील रमेश नानुराम बंछरा यांच्या म्हणण्यानुसार, हातावर टॅटू आणि पायाभोवती काळ्या दोरा बांधलेल्या शारिरीक खुणांच्या आधारे कुजलेला मृतदेह हा मुलीचाच असल्याचं आम्ही ओळखलं होतं. ती ललिता होती, असा विश्वास ठेवून कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले होते.
दरम्यान, वृत्तानुसार, पोलिसांनी नंतर हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तिच्या कथित हत्येसाठी चार आरोपींना अटक केली आणि ते आरोपी अद्यापही तुरुंगात आहेत. मात्र, आता तब्बल १८ महिन्यानंतर ललिता आपल्या गावी जिवंत परतली आहे. आता ती जिवंत पाहून तिच्या वडिलांना मोठा धक्का बसला. तिला जिवंत पाहून विश्वासच बसला नाही, मग त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली आणि धक्कादायक माहिती समोर आली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दुसऱ्या व्यक्तीला पाच लाख रुपयांना विकले
ललिताने ती बेपत्ता झाल्याबद्दल बोलताना सांगितलं की, “ती शाहरुख नावाच्या व्यक्तीबरोबर भानुपारा येथे गेली होती. दोन दिवस तिथे राहिल्यानंतर तिला दुसऱ्या व्यक्तीला ५ लाख रुपयांना विकण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. तिने असा दावा केला की ती कोटामध्ये दीड वर्ष राहिली आणि नंतर तिला पळून येण्याची संधी मिळाली आणि ती आपल्या गावी परतली.
दरम्यान, पोलिसांनी तिची ओळख शेजारी आणि कुटुंबातील सदस्यांमार्फत पडताळून पाहिली. पुष्टी केल्यानंतर ती खरोखरच ललिता असल्याचं स्पष्ट झालं. ललिताला दोन मुले आहेत, त्या मुलांना आई जिवंत आल्याचं पाहून आनंद झाला.
चार जणांवर खुनाचा आरोप अन् आरोपी तुरुंगात
दरम्यान, ललिता जिवंत घरी आली असली तरी तिच्या कथित हत्येप्रकरणी चार जणांना दोषी ठरवण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ती गायब झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले आणि तिच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. मग ज्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता तो मृतदेह कोणाचा होता? आणि जे आरोपी तुरुंगात आहेत ते कोणत्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.