देवास (मध्य प्रदेश): लग्नाचा थाटमाट, अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात झेंडूच्या फुलांचे हार आणि हातात मिठाईचे डब्बे घेऊन तब्बल ४२ नवरदेव मोठ्या उत्साहाने विवाहस्थळी पोहोचले. लग्नबंधनात अडकण्याची स्वप्ने डोळ्यात घेऊन आलेल्या या तरुणांना काही वेळातच एका अशा धक्कादायक सत्याचा सामना करावा लागला, ज्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे एकही नवरी आलीच नव्हती! ‘अनाथाश्रमातील मुलींशी लग्न लावून देऊ’ असे आमिष दाखवून या सर्व तरुणांची एका मोठ्या टोळीने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील देवासमध्ये समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा केवळ आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नसून, ग्रामीण भागातून आलेल्या डझनभर तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा झालेला मोठा मानसिक छळ आहे. इंदूरमधील एका नामांकित अनाथाश्रमाचे नाव वापरून या तरुणांना सामूहिक विवाहाचे आमिष दाखवण्यात आले होते. रविवारी संध्याकाळपर्यंत विवाहस्थळावरील आनंदाचे वातावरण संताप आणि निराशेमध्ये बदलले.

इंटरनेटवरील फोटो दाखवून केला बनाव

मिळालेल्या माहितीनुसार, या फसवणुकीसाठी प्रत्येक नवरदेवाकडून १५,००० ते २५,००० रुपयांपर्यंत ‘नोंदणी शुल्क’ उकळण्यात आले होते. लग्न ठरवण्यापूर्वी मध्यस्थांनी तरुणांना मोबाईलवर मुलींचे फोटो दाखवले होते. या मुली गरीब असून अनाथाश्रमात वाढल्या आहेत, त्यामुळे त्या लगेच लग्नास तयार असल्याचे तरुणांना सांगण्यात आले.

“आम्हाला इंदूरच्या ‘मातृ छाया आश्रमा’तील मुलींचे फोटो दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात ते फोटो सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेले मॉडेल्सचे होते. आम्हाला आदल्या दिवशीच देवासला पोहोचायला सांगितले होते आणि हुंडा म्हणून संसारोपयोगी साहित्य देण्याचेही आश्वासन दिले होते. पण आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा तिथे कोणीच नव्हते आणि सर्व आयोजकांचे फोन बंद झाले होते,” अशी आपबिती हरनियाकलन गावातून आलेल्या राहुल नावाच्या एका तरुणाने सांगितली.

‘हळद-मेहंदी लावून येऊ नका’; भामट्यांची अजब अट!

या टोळीने फसवणुकीचे नियोजन अत्यंत चलाखीने केले होते. अशोक नावाच्या एका पीडित नवरदेवाने सांगितले की, “आम्हाला घरून साध्या कपड्यांमध्ये येण्यास सांगण्यात आले होते. लग्नाचे कपडे (शेरवानी) आणि विवाहाचे सर्व विधी तिथेच केले जातील, असे आयोजकांनी सांगितले होते. इतकेच नाही तर घरून हळद किंवा मेहंदी लावून येऊ नका, सर्व विधी विवाहस्थळीच होतील, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली होती.”

भोपाळहून आलेल्या ओमप्रकाश यांच्या कुटुंबानेही मोबाईलवर फोटो पाहूनच आपल्या भावाचे लग्न ठरवले होते. ऑनलाइन कागदपत्रे जमा केल्यानंतर ते सहकुटुंब देवासला पोहोचले. एका पीडित नवरदेवाच्या बहिणीने सांगितले की, “आम्ही लग्नकार्यासाठी गाड्या भाड्याने केल्या होत्या. अनेक नातेवाईक सोबत होते. तिथे पोहोचल्यावर आयोजक ‘मॅडम नवरी मुलींना घेऊन रस्त्यातच आहेत’ असे सांगत राहिले, पण मध्यरात्रीपर्यंत तिथे कोणीच आले नाही. सर्वांसमोर आमची मोठी नाचक्की झाली.”

रॅकेटचे मुख्य सुत्रधार, आरोपी पती-पत्नी गजाआड

बँक नोट प्रेस पोलीस ठाण्याच्या प्रभारी प्रीती कटारे यांनी सांगितले की, “अनेक तरुणांनी या संदर्भात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने सुरू केला आहे. ज्या अनाथाश्रमाच्या नावाचा गैरवापर करण्यात आला, त्याबाबतही पडताळणी सुरू आहे.”

२४ मे रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. या रॅकेटचा मुख्य सुत्रधार मुकेश आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी विदिशा जिल्ह्यातील रहिवासी असून, पोलिसांनी अधिक तपासासाठी आणि त्यांच्या गुन्ह्याची पद्धत (Modus Operandi) समजून घेण्यासाठी एक पथक विदिशाला रवाना केले आहे. या टोळीने आतापर्यंत किती तरुणांना अशा प्रकारे लुबाडले आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.