Madhya Pradesh Dhar accident: मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात १२ मजुरांचा मृत्यू झाला आहे. धार जिल्ह्यातील बग्गड मार्गावरच्या चिकलिया परिसरात हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात २० मजूर जखमी देखील झाले आहेत. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी २ लाख रुपये जाहीर करण्यात आले असून जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं मध्य प्रदेशमध्ये?

धार जिल्ह्यातील बग्गडहून मोठ्या प्रमाणावर मजुरांना घेऊन ही पिकअप व्हॅन निघाली होती. चिकलिया भागात व्हॅन आली असता चालकाचा व्हॅनवरचा ताबा सुटला आणि काही क्षणांत ही व्हॅन उलटली. त्यानंतर विरुद्ध दिशेनं वेगात येणाऱ्या एसयूव्हीवर ही व्हॅन जाऊन आदळली.

धार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिषेक चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की त्यातील १२ मजुरांचा जागच्या जागी मृत्यू झाला. गंभीररीत्या जखमी झालेल्या मजुरांना इंदौर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे.

या अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यासंदर्भात तपास चालू आहे.

“हे कामगार पिकअप व्हॅनमधून कुठेतरी गेले होते. तिथून परत येत असताना चालकाचा व्हॅनवरील ताबा सुटला आणि व्हॅन तीनवेळा उलटली. या घटनेची मुख्यमंत्र्यांनीदेखील गंभीर दखल घेतली आहे. मला वाटतं की यात व्हॅनचालकाची प्रामुख्याने चूक आहे. पिकअप व्हॅन इतकी वेगात होती की चालकाला त्यावर नियंत्रण ठेवता आलं नाही”, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

पंतप्रधान कार्यालयाकडून अपघाताची दखल

दरम्यान, केंद्र सरकारने या अपघाताची दखल घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. “धार दुर्घटनेत प्राण गमवावे लागलेल्या व्यक्तींसाठी मला मनस्वी दु:ख होत आहे. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. तसेच, जखमी व्यक्ती लवकर बऱ्या होवोत ही प्रार्थना. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफमधून २ लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्यात येईल”, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स हँडलवर करण्यात आली आहे.